ईश्वरी देशपांडेंच्या ‘कंफ्लुएन्स’ कथक कार्यक्रमाने प्रेक्षकांची मनं जिंकली
marathinews24.com
पुणे – भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाउंडेशन यांच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत शनिवार ( दि. २८) एकल कथक नृत्याचा ‘कंफ्लुएन्स’ हा कार्यक्रम उत्साही प्रतिसादात पार पडला. ईश्वरी देशपांडे यांनी आपल्या मोहक व आकर्षक सादरीकरणातून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. हा कार्यक्रम सरदार महादेव बळवंत नातू सभागृह, सेनापती बापट रस्ता याठिकाणी वाजता आयोजित केला होता.
ईश्वरी देशपांडे या ज्येष्ठ नृत्यांगना प्रेरणा देशपांडे यांच्या कन्या व शिष्या असून त्यांच्या नृत्यात गुरु परंपरेचा दर्जेदार ठसा स्पष्टपणे दिसून आला. नृत्य सादरीकरणास ईशान परांजपे(तबला), यशवंत थिटे(संवादिनी ) , शुभम खंडाळकर(गायन), कल्याणी गोखले(पढंत) यांनी साथ दिली. कृष्ण स्तुतीने प्रारंभ झाला.नृत्य आणि संगीत यांच्या सुरेल संगमाने ‘कंफ्लुएन्स’ हे शीर्षक सार्थ ठरले.
कार्यक्रमाला कथक क्षेत्रातील ज्येष्ठ नृत्यांगना डॉ. सुचेता भिडे-चाफेकर, डॉ. सत्यशील देशपांडे, तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते. रसिकांनीही कार्यक्रमास उत्स्फूर्त दाद दिली. भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाउंडेशन यांच्या सांस्कृतिक कार्यक्रम मालिकेतील हा २५० वा कार्यक्रम होता. यानिमित्ताने एक महत्त्वाचा टप्पा गाठल्याचे समाधान भारतीय विद्या भवन पुणे केंद्राचे मानद सचिव प्रा. नंदकुमार काकिर्डे यांनी व्यक्त केले. त्यांनी सर्व उपस्थितांचे आणि सहकलाकारांचे मन:पूर्वक आभार मानले.सर्व कलाकारांचा प्रशस्तीपत्र व ज्ञानेश्वरीची प्रत देऊन सत्कार करण्यात आला.