पूर्वा म्युझिक प्रस्तुत ‘भाई खुळावलो’ गाणं प्रेक्षकांच्या भेटीला
marathinews24.com
मुंबई – मालवणी भाषेचा खट्याळपणा, कोकणी-गोवन संगीताचा साज आणि प्रेमात पडलेल्या एका गावठी भाईची भन्नाट कथा यांचा अनोखा मिलाफ असलेलं ‘भाई खुळावलो’ (Bhai Khulavlo Song) हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. पुर्वा म्युझिक प्रस्तुत आणि सेव्हन सीज मोशन पिक्चर्स निर्मित या गाण्याची निर्मिती समीर परब यांनी केली असून, गाण्याचं संगीत आणि दिग्दर्शन प्रितीश प्रकाश कामत यांनी केलं आहे. गायक नागेश मुरवेकर यांच्या खट्याळ आणि मिश्कील आवाजामुळे गाण्याला अस्सल मालवणी रंग लाभला आहे. या गाण्यात अभिनेता नितीश चव्हाण आणि अभिनेत्री रुचिरा जाधव प्रमुख भूमिकेत आहेत.
राजकारणाचे साहित्यात प्रतिबिंब उमटले पाहिजे- डॉ. नीलम गोऱ्हे – सविस्तर बातमी
गाण्याच्या संकल्पनेबद्दल संगीतकार-दिग्दर्शक प्रीतीश कामत सांगतात की, “सुरुवातीला या गाण्याचे बोल मराठीमध्ये तयार करण्यात आले होते. मात्र, संगीतबद्ध करताना गाण्याला आणखी वेगळा आणि हटके टच देण्याची गरज जाणवली. त्यातून एका मुलीच्या प्रेमात पडलेल्या गावातील भाईची व्यक्तिरेखा आणि त्याची गंमतीदार प्रेमकहाणी साकारण्याची कल्पना सुचली. ‘खुळावलो’ (Bhai Khulavlo Song) हा मालवणी भाषेतील शब्दप्रयोग या व्यक्तिरेखेला आणि कथेला अगदी साजेसा वाटल्याने संपूर्ण गाणं मालवणी भाषेत पुन्हा साकारण्यात आलं. गाण्याच्या संगीतामध्ये मालवणी आणि कोकणी लोकसंगीतासोबत गोवन संगीताची झलक देण्यात आली असून, स्थानिक फोक आणि तारकर्लीच्या वातावरणाशी जुळणारी संगीताची वाईब तयार करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या गाण्याच्या संगीत निर्मितीची सुरुवात अकापेला पद्धतीने करण्यात आली होती. केवळ वोकल्सच्या माध्यमातून संगीताचा बेस तयार करत पुढे त्यामध्ये विविध वाद्यांचा समावेश करण्यात आला.”
अभिनेत्री रूचिरा जाधव या गाण्याच्या चित्रीकरणा दरम्यानचा गंमतीदार किस्सा सांगते, “कोकणात शूट होतं म्हणून मी फार उत्सुक होते. पण शूटींग दरम्यान मला समुद्रात बुडण्याचा सीन होता असं कळलं. मला आधीच पाण्याची भीती वाटते. मी टीमला हे सांगताच सगळ्यांनीच चिंता व्यक्त केली. परंतु प्रोडक्शनने आवश्यक सुरक्षा व्यवस्था आणि लाइफसेव्हर्सची व्यवस्था केलेली. आणि मग अश्याप्रकारे मी तो सीन यशस्वीपणे पूर्ण केला. त्या सीनमधील माझे हावभाव हे खरे आहेत. सकाळी ८ वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजेपर्यंत सुरू असलेल्या या शूटमध्ये मी, सहकलाकार नितीश आणि तंत्रज्ञांनी खूप धमाल केली. त्यामुळे शूटिंगदरम्यानची धमाल आणि गाण्याची रंगत व्हिडिओमध्येही जिवंतपणे उमटली आहे.”
नितीश चव्हाण यांच्या नृत्याला विशेष महत्त्व देण्यात आलं असून पुण्यकर उपाध्याय यांनी कोरिओग्राफी केली आहे. गाण्याचं चित्रीकरण मालवण आणि तारकर्ली परिसरात करण्यात आलं असून MTDC, तारकर्ली आणि सोलकढी रेस्टॉरंट या ठिकाणांचा विशेष वापर करण्यात आला आहे. चित्रीकरणादरम्यान आलेले मजेशीर अनुभवही या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतात. Bhai Khulavlo Song या गाण्याचे गीतकार सचिन कोतुळकर, अरेंजर उदय साळवी, फिमेल व्होकल्स प्राजक्ता माने, कोरस गोविंद कांबळे, विपुल कदम, श्रीकांत शिरसाट आणि प्रितीश कामत असून रूपक ठाकूर यांनी मिक्सिंग आणि मास्टरिंग केलं आहे.
व्हिडिओचं दिग्दर्शन आणि एडिटिंग प्रितीश प्रकाश कामत यांनी, छायांकन आणि कलरिंग शशि उपाध्याय यांनी, तर प्रॉडक्शन डिझाइन प्रवीण चिंदरकर आणि टीम यांनी केलं आहे. हेमंत सोनावणे कार्यकारी निर्माते असून कॉस्च्युम स्टायलिंग ओंकार माने, तर मेकअप आणि हेअर सौरभ बर्डे यांनी केलं आहे. पूर्वा म्युझिकसाठी पूर्वा भगवान मिश्रा प्रेझेंटर, आर्यन भूदत्त मॅनेजमेंट आणि श्रद्धा शुक्ला मार्केटिंगची जबाबदारी सांभाळत आहेत. मालवणी भाषेतील मिश्कील संवाद, रंगतदार संगीत, नृत्य आणि प्रेमात पडलेल्या ‘भाई’ची मजेशीर कहाणी यामुळे ‘भाई खुळावलो’ हे गाणं प्रेक्षकांसाठी एक वेगळा आणि मनोरंजक संगीत अनुभव ठरणार आहे. सध्या हे गाणं सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.






















