रूग्णालयातील कामगार मावशी अन डॉक्टरांमुळे वाचले रूग्ण; बॉम्बसाठी आयईडीचा (इम्प्रुव्हाईज्ड एक्सप्लोसीव्ह डिव्हाईस) वापर
marathinews24.com
पुणे – शहरातील हडपसर परिसरातील खासगी रुग्णालयातील स्वच्छतागृहात बॉम्ब ठेवल्याची धक्कादायक घटना बुधवारी (दि. १३) रात्रीच्या सुमारास उघडकीस आली. बॉम्बवर चकाकणार्या लाल अक्षरातील टायमर पट्टीमुळे कामगार मावशीने तत्परतेने ही माहिती डॉक्टरांना दिली. त्यानंतर डॉक्टर आणि मावशीने चक्क तो बॉम्ब उचलून रूग्णालयाबाहेर ठेवल्यामुळे मोठा अनर्थ टळला. याप्रकरणी आतापर्यंत १५ ते १७ जणांची कसून चौकशी करण्यात आली आहे. मात्र, त्यांचा काही संबंध नसल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही बॉम्ब संदर्भातील घटनेची पुष्टी केली आहे.
लाच प्रकरणात बावधन पोलीस ठाण्यातील महिला पोलीस अधिकाऱ्याला पकडले – सविस्तर बातमी
हडपसर भागात उषा किरण खासगी रुग्णालय आहे. रुग्णालयाच्या प्रसाधनगृहात बॉम्बसदृश संशयास्पद वस्तू कामगार मावशीने बुधवारी सायंकाळी पाहिल्याने तिने डॉक्टरांना महिती दिली. त्यानंतर रूग्णालयाने पोलिसांनाही बॉम्बच्या घटनेची माहिती दिली. त्यानुसार हडपसर पोलिसांसह गुन्हे शाखा, बीडीडीएस पथक, दहशतवाद विरोधी पथकाने धाव घेतली. संबंधित बॉम्ब निकामी करण्यात बीडीडीएस पथकाला यश आले आले. याप्रकरणी पोलिसांनी रुग्णालय परिसरातील सीसीटीव्ही फुटेजनुसार पोलिसांनी एका तरुणासह १५ ते १७ जणांची कसून चौकशी केली. मात्र, प्राथमिक तपासात त्यांचा या प्रकरणाशी संबंध नसल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांना चौकशीनंतर सोडून दिले. सध्यास्थितीत रुग्णालय परिसरातील सुरक्षा वाढविली असून, बॉम्ब सापडलेले ठिकाणांसह संशयित वस्तूची बारकाईने तपासणी केली. तेव्हा त्यामध्ये चार जिलेटिनच्या कांड्या, टायमर, वायरी आढळून आल्या. बॉम्बशोधक व बॉम्बनाशक पथकाने बॉम्ब सुरक्षित ठिकाणी नेउन निकामी केला. दरम्यान, या घटनेनमुळे रुग्णालयासह संपुर्ण हडपसर परिसरात घबराट उडाली होती.
गुन्हे शाखेसह स्थानिक पोलीस आणि दहशतवाद विरोधी पथकाकडून परिसरातील सर्व सीसीटीव्ही तपासण्यात आले आहेत. रूग्णालयात एकजणाने बॉक्स ठेवून संशयित तेथून निघून गेल्याचे सीसीटीव्हीतून दिसून आले. दरम्यान, संबंधिताला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याच्याकडे तपास करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिसांची तीन स्वतंत्र पथके तयार केली आहेत. घटनेमागे आरोपीचा नेमका हेतू काय होता; तसेच संबंधित व्यक्ती एकटी होती, की तिच्यासोबत आणखी कोणी सहभागी होते, याचाही तपास सुरू आहे. अफवांवर विश्वास ठेउ नका, घाबरून जाउ नका, असे आवाहन पुणे पोलिसांनी केले आहे.
बॉम्बमध्ये ७ तासांचा टायमर, लो ग्रेड आयईडीचा वापर
बॉम्बमध्ये ७ तासांचा टायमर सेट केलेला होता. टायमर लावलेला जिवंत बॉम्ब हा लो ग्रेड आयईडी असल्याचे निष्पन्न झाले. स्फोटक लावून त्याला सर्किट आणि टायमर जोडल्याचे तपासात उघड झाले. बॉम्ब शोधक व नाशक पथकाने बॉम्बला हडपसर येथील ग्लायडिंग सेंटरच्या मोकळ्या मैदानात नेऊन निकामी केला.
बॉम्बसाठी वापरली स्फोटक यंत्रणा
बॉम्ब तयार करण्यासाठी आयईडी (इम्प्रुव्हाईज्ड एक्सप्लोसीव्ह डिव्हाईस) स्फोटक यंत्रणाच असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली असून, रुग्णालयात घातपात घडविण्याचा डाव होता का, याचा तपास आता दहशतवाद विरोधी पथक तसेच पुणे पोलिसांकडून सुरू केला आहे.
तर मोठी जीवितहानी झाली असती
आयईडीमध्ये जिलेटिन, टायमर, डिटोनेटर, वायर, अॅल्युमिनियम कव्हर आणि सेन्सर आढळून आले आहेत. हे सर्व साहित्य आयईडी तयार करण्यासाठी वापरले जाते, असे तपासात स्पष्ट झाले आहे. हाच जर स्फोट दवाखान्याच्या शौचालयात घडला असता तर, जीवितहानी झाली असती. आयईडी अत्यंत सराईतपणे बनविण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे. त्यामुळे या मागे प्रशिक्षित किंवा स्फोटकांबाबत माहिती असलेल्या व्यक्तींचा हात असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केला आहे. पुणे पोलिस आयुक्तालयातील विविध तपास पथके प्रकरणाचा समांतर तपास करत असून, फॉरेन्सिक विभाग आणि बीडीडीएसने घटनास्थळावरील नमुने ताब्यात घेतले आहेत. हे नमुने पुढील परीक्षणासाठी प्रयोगशाळेत पाठविले आहेत.






















