आठवडभरात दोन महिला अधिकारी ‘एसीबी’च्या जाळ्यात
marathinews24.com
पुणे – पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेतील सहायक पोलीस निरीक्षक वैशाली तोटेवार यांनी मध्यस्थामार्फत २८ लाख रुपयांची लाच घेतल्याचे प्रकरण ताजे असतानाच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील बावधन पोलीस ठाण्यात नियुक्तीस असलेल्या सहायक पोलीस निरीक्षक ज्योती तांबे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. तांबे यांनी एकाकडून ५० हजारांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाल्यानंतर एसीबीच्या पथकाने ही कारवाई केली. याप्रकरणी बावधन पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक ज्योती पांडुरंग तांबे (वय ४१, सध्या रा. ड्रिम रिदम सोसायटी, पाटीलनगर, बावधन) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. या प्रकरणात तांबे यांना रात्री उशीरा ताब्यात घेण्यात आले.
अल्पवयीनासोबत अश्लील कृत्य करणारा अटकेत – सविस्तर बातमी
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार आणि त्यांच्या नातेवाईकांविरुद्ध बावधन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात मदत करणे, अटक न करणे, तसेच लवकर आराेपपत्र दाखल करण्यासाठी सहायक पोलीस निरीक्षक तांबे यांनी तक्रारदाराकडे ५० हजारांची लाच मागितली होती. तक्रारदाराने त्यांना पहिला हप्ता म्हणून ५० हजार रुपये लाच दिली होती. त्यानंतर तडजोडीत आणखी पैसे देण्याची मागणी त्यांनी केली होती. याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिल्यानंतर पडताळणी करण्यात आली. चौकशीत तांबे यांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाल्यानंतर रात्री उशीरा त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याविरुद्ध बावधन पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांंडे, अतिरिक्त अधीक्षक अजित पाटील, अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त नीता मिसाळ यांनी ही कारवाई केली. पोलीस निरीक्षक सूहास हट्टेकर तपास करत आहेत.
पुणे पोलीस दलातील तीन अधिकाऱ्यांसह चौघांना लाच प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) पकडले. पोलीस दलातील लाचखोरीच्या प्रकरणांवर पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी पोलीस आयुक्तालयात पार पडलेल्या बैठकीत नाराजी व्यक्त केली होती. लोहगाव पोलीस ठाण्यातील एका पोलीस उपनिरीक्षकाने अदखलपात्र गुन्ह्यात मदत करतो, असे सांगून ८० हजारांची लाच घेतली. उपनिरीक्षकाला अटक करण्यात आली. हे प्रकरण ताजे असतानाच आर्थिक गुन्हे शाखेतील एका महिला सहायक पोलीस निरीक्षकासह दोघांना २८ लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बंडगार्डन रस्ता परिसरात पकडले. कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यातील एका पोलीस हवालदाराने न्यायालयाने बजाविलेले अटक वाॅरंट न बजाविण्यासाठी दीड लाख रुपयांची लाच घेतल्याची घटना नुकतीच घडली. गेल्या महिन्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी एक लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यातील एका पोलीस उपनिरीक्षकाला अटक करण्यात आली होती.






















