आंबेगाव पोलीस ठाण्याच्या नूतन इमारतीचे केले उदघाटन
marathinews24.com
पुणे – शहरात कायदा सुव्यवस्था राखण्यासोबतच पोलिसांनी कोणत्याही गावगुंडांचा मुलाहिजा ठेउ नका. जर कोणी दादागिरी आणि दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास त्याच्याविरूद्ध कठोर कारवाई करा. सर्वसामान्य नागरिकांमधील आपली प्रतिमा उंचावण्यासाठी सातत्याने प्राधान्य देण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहेत. पोलीस आयुक्तालयअंतर्गत असलेल्या आंबेगाव पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीचे उदघाटन शुक्रवारी (दि. २३) त्यांनी केले. यावेळी सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक आयुक्त राहुल आवारे उपस्थित होते.
पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले, पुणे शहराच्या वाढत्या विस्तारामुळे कायदा सुव्यवस्थेच्या अनुषंगाने पोलिसांवरील जबाबदारी वाढली आहे. त्याअनषंगाने प्रत्येकाने आपआपली जबाबदारी ओळखून कामासाठी प्रयत्नशील राहणे गरजेचे आहे. त्यासोबतच सर्वसामान्य नागरिकांच्या पोलिसांकडून अपेक्षा वाढल्याने आमचीही जबाबदारी वाढली आहे. त्यामुळे अधिकार्यांसह कर्मचार्यांनी तक्रारदारांच्या समस्येवर तोडगा काढण्याचे काम करणे आवश्यक आहे. दरम्यान, कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे हद्दीमध्ये सुरू असतील तर वेळीच कारवाई करा. अन्यथा संबंधितांच्या इतर सबबी ऐकून घेतली जाणार नाही. गावगुंड, दहशत दादागिरी करणार्यांचे कंबरडे मोडा. कोणाचाही मुलाहिजा ठेउ नका, असे आदेश त्यांनी ठाणे प्रमुखांना दिले आहेत.
नागरिकांना चांगली सेवा देणे जबाबदारी – सह पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा
सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा म्हणाले, सर्वसामान्य नागरिकांना चांगली सेवा देणे आपली जबाबदारी आहे. त्यासाठी आता नवीन पोलीस ठाण्याच्या माध्यमातून तुमचे काम चांगले झालेच पाहिजे. कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याचे आदेश त्यांनी दिले. नागरिकांसाठी विशेष तक्रार निवारण मोहीम प्रत्येक शनिवारी सुरू असून, जास्तीत जास्त प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अॅड दिलीप जगताप यांनी तर आभार शरद झिने यांनी मानले.
शहरातील कायदा सुव्यवस्था कायमस्वरूपी राखण्याचा आमचा महत्वाचा अजेंडा असून, त्यासाठी विशेष प्राधान्य दिले जाते. प्रामुख्याने अमलदारांपासून वरिष्ठ अधिकार्यांपर्यंत चांगले कामकाज करण्यावर भर दिला जात आहे. महिला सुरक्षितता, जेष्ठ नागरिक, शालेय विद्यार्थी-विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी आमचे पोलीस दल सदैव कार्यमग्न आहे.
अमितेश कुमार, पोलीस आयुक्त, पुणे शहर