पुण्याच्या विश्रामबाग पोलिसांची शिरोळमध्ये कारवाई
marathinews24.com
पुणे – Fake Currency Racket Pune : हिंदुस्थानी चलनातील हुबेहुब दिसणार्या बनावट ५०० रूपयांच्या नोटांचा कारखाना पुण्याच्या विश्रामबाग पोलिसांनी कोल्हापूरमधील शिरोळमध्ये जाउन उध्वस्त केला आहे. याप्रकरणी चौघांना अटक केली असून, त्यांच्याकडून ५ लाख ६४ हजार रुपयांचे बनावट चलन, नोटा बनवण्यासाठी लागणारा कलर प्रिंटर, कॅम्प्युटर, सीपीयू असा साठा जप्त केला आहे. संबंधित एक आरोपी पुण्यातील शुक्रवार पेठेत बनावट नोटा चलनात आणण्यासाठी आला होता. मात्र, विश्रामबाग पोलीस ठाण्यातील दोन चाणाक्ष हवालदारानी त्याला हेरून ताब्यात घेतले. तपासानंतर पोलिसांनी कोल्हापूरनजीक शिरोळमध्ये जाउन आणखी तिघांना बेड्या ठोकून बनावट नोटांचा कारखाना उघकीस आणला.
हल्ल्यासाठी पैशांची साखळी, सूत्रधाराचा शोध सुरू; उद्योजक राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरण – सविस्तर बातमी
सलमान जैनद्दीन राजे (वय ३० रा. केडगाव, दौंड) शाफाज फिरोज अन्सारी (वय ३० रा. नालासोपारा) विशाल विलास गलांडे (वय ३७ रा.सुरुपखनवाडी, माण, खटाव) अभिजीत रावसाहेब कांबळे (वय ३० रा. शिरोळ, कोल्हापूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. बनावट नोटा घेउन एकजण पुण्यातील शुक्रवार पेठेत येणार असल्याची माहिती पोलीस हवालदार सचिन अहिवळे आणि शैलेश सुर्वे यांना मिळाली. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक नवनाथ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सत्यवान गेंड यांच्या पथकाने सापळा रचला. महात्मा फुले मंडईजवळ आलेल्या सलमान राजे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून ५०० रुपयांच्या बनावट ८०५ नोटा जप्त करण्यात आल्या.
चौकशीत आरोपीने आणखी तीन साथीदार असल्याची माहिती दिली. त्यानुसार उपायुक्त कृषीकेश रावले यांच्या आदेशानुसार पोलिसांचे पथक सातारा, कोल्हापूरकडे रवाना झाले. पथकाने आणखी तिघांना कोल्हापूर पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेउन अटक केली. (Fake Currency Racket Pune) त्यांच्याकडून बनावट नोटा बनवण्याचे साहित्य जप्त केले. त्यासोबतच आरोपी शाफाज अन्सारी याच्या घरातून ५०० रुपयांच्या ३२३ बनावट नोटा जप्त केल्या. चारही आरोपींकडून तब्बल १ हजार १२८ बनावट नोटा जप्त केल्या आहेत. ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहआयुक्त संजय दराडे, अपर आयुक्त राजेश बनसोडे, एसीपी अनुजा देशमाने, वरिष्ठ निरीक्षक नवनाथ जगताप, पोलीस निरीक्षक विकास भिंगारदिवे, पोलीस निरीक्षक रमेश लाहिगुडे, एपीआय उमेश कारके, मेहबुब मोकाशी, सचिन कदम, वैâलास डुकरे, समीर पवार, शशिकांत दरेकर यांनी केली.
असे बनवत होते बनावट ५०० रुपयांची नोट
अटकेतील चारही आरोपीविरुद्ध विविध स्वरुपाचे गुन्हे असून, त्यांनी बनावट नोटा छापण्यासाठी कलर प्रिंटर घेतले होते. इंटरनेटवरील माहितीच्या आधारे ते बनावट ५०० रुपयांची नोट बनवत होते. जवळपास ६ लाख रुपये किंमतीच्या बनावट नोटा तयार करण्यात आल्या. त्यानंतर मेट्रो सिटी असलेल्या पुण्यात दिवाळीत दुकानदाराकडे अथवा सर्वसामान्यांना नोटा देउन फसवणूक करण्याचा डाव आरोपींनी रचला होता. मात्र, खबर्यांचे नेटवर्क असलेले हवालदार सचिन अहिवळे, शैलेश सुर्वे यांना आरोपीची माहिती मिळाली. त्यानुसार बनावट नोटा बनणार्या टोळीचे बिंग फुटले.
























