संबंधित महिलेविरोधात फुरसुंगी पोलीस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – बांधकाम व्यावसायिकाला तब्बल १० कोटी रुपयांचे कर्ज मिळवून देण्याची बतावणी करीत महिलेने उरळी देवाची परिसरात शेवाळेवाडीतील एकाला ३५ लाखांचा गंडा घातला आहे. याप्रकरणी उल्हास रामचंद्र शेवाळे (वय ४९) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार माधुरी हेमंत शिरोडकर (वय ५१ रा.वारजे ,पुणे ) महिलेविरुद्ध फुरसुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २०२० ते २०२३ कालावधीत बँक अधिकाऱ्यांची नावे सांगून त्यांना खर्चाकरता व कर्ज प्रकरण मंजुरी करता लागणारी प्रोसेसिंग फी म्हणून वेळोवेळी रोख स्वरूपात चेकने तसेच बँक खात्यातून सुमारे ३५ लाख रुपये घेऊन फसवणूक केली आहे.
पुण्यातील किडनी रॅकेटमध्ये ससूनमधील डाॅ. अजय तावरे सहआरोपी – सविस्तर बातमी
आरोपी माधुरी शिरोडकर हिच्यावर फुरसुंगी पोलीस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार उल्हास शेवाळे हे बांधकाम व्यावसायिक असून, ते सी ए सचिन शिंदे यांच्याकडे कामासाठी जात होते. सन २०२० मध्ये ते शिंदे यांच्या कार्यालयात गप्पा मारत असताना, त्यांनी कर्ज काढायचे असल्याचे सांगितले. तुमचे कर्ज प्रकरण करून देणारे कोणी ओळखीचे आहे का असे त्यांनी विचारले असता, माधुरी शिरोडकर यांची ओळख शिंदे यांनी करून दिली. शिरोडकर यांची विविध बँकेत ओळख असून त्या बँकेत मोठी कर्ज प्रकरणे मंजूर करून देतात असे शिंदे यांनी सांगितले. त्यानुसार शिरोडकर यांना बांधकाम व्यवसायासाठी १० कोटी रुपयांचे कर्ज असल्याचे सांगण्यात आले. शिरोडकर यांनी संबंधित कर्ज प्रकरण करून देते असे आश्वासन दिले. शिरोडकर यांनी तुम्हाला जर तात्काळ कर्ज हवे असेल तर तुम्ही नवीन कर्ज प्रकरण तयार करून घेण्याचे ठरवले, तर त्याला खूप वेळ जाईल असे तिने सांगितले.
मी माझ्या स्वतःच्या कामाकरीता कर्ज प्रकरण बँकेत फाईल करून रक्कम ५० कोटी रुपये कर्ज मंजूर करून ठेवलेले आहे. परंतु सध्या मला इतक्या मोठ्या रकमेची गरज नाही. मी तुम्हाला तत्काळ माझ्या ५० कोटी कर्ज मधून १० कोटी रुपये कर्ज वापरण्यासाठी देऊ शकते. परंतु त्यासाठी तुम्ही मला कर्ज प्रकरणासाठी लागणारी प्रोसेसिंग फी व इतर खर्च करताना लागणारी रक्कम मला तुम्ही द्या असे शिरोडकर म्हणाली. त्यावेळी त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून वेळोवेळी शेवाळे यांनी शिरोडकर यांना ३५ लाख रुपये विविध कामांसाठी दिले. मात्र ,त्यानंतर शिरोडकर यांनी कर्ज प्रकरणाबाबत विचारणा केल्यावर टाळाटाळ सुरू केली तसेच दिलेली रक्कम परत केली नाही त्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात आले.