श्री गजानन मित्र मंडळ ट्रस्टच्या वतीने कपडे वाटप
marathinews24.com
पुणे – दिवाळीचा आनंद गरजू मुलांपर्यंत पोहोचविण्याच्या भावनेतून श्री गजानन मित्र मंडळ ट्रस्ट, तुळशीबाग यांच्यावतीने नागरवस्ती भागातील वंचित मुलामुलींना नवीन कपडे वाटप करण्यात आले. मंडळाचे अध्यक्ष सागर दहीभाते यांच्या पुढाकाराने आणी तुळशीबागेतील व्यापारी, कामगार व गजानन परिवाराच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात आला. कार्यक्रमाला आमदार हेमंत रासने, पोलीस उपायुक्त कृषीकेश रावले, अतिक्रमण विभागाचे उपायुक्त सोमनाथ बनकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे प्रचार विभाग प्रमुख अतुल अग्निहोत्री उपस्थित होते.
इंग्रजी भाषेतील भारतातील पहिला ‘मी’ दिवाळी अंकाचे प्रकाशन – सविस्तर बातमी
मुलामुलींना नवीन कपड्यांचे वाटप करण्यात आले. २०१६ मध्ये छोट्या स्वरूपात सुरू झालेल्या या उपक्रमाचे यंदा अकरावे वर्ष आहे. कार्यक्रमाच्या नियोजनात मंडळाचे सदस्य आशिष शहा, अरविंद तांदळे, नरेश माळवे, रोहिणी हांडे, सुजाता गुळुमकर, अलका नवघिरे, कुमार कांबळे, शुभम गोरे, गणेश कदम, सिद्धार्थ सातपुते, प्रताप बिरादार आणी जयदीप ठेंगुरकर यांनी सक्रिय सहभाग घेतला. कपडे वाटप, अल्पोपाहार तसेच कार्यक्रमातील विविध व्यवस्थांची जबाबदारी या सदस्यांनी सांभाळली.यंदाच्या कपडे वाटप उपक्रमाचा हा पहिला टप्पा असून, दिवाळीनंतर आणखी दोन टप्प्यांत गरजू मुलांपर्यंत मदत पोहोचविण्याचा प्रयत्न असल्याची माहिती ट्रस्टचे विश्वस्त सुनील उर्फ भाऊ दहीभाते यांनी दिली. उपक्रमासाठी सहकार्य करणारे सर्व सदस्यांचे त्यांनी आभार मानले. तुळशीबागेतील व्यापारी, कामगार आणी सदस्यांच्या सहकार्याने दरवर्षी हा उपक्रम राबविला जातो. व्यवसायासोबत सामाजिक जबाबदारी जपणाऱ्या सर्वांच्या सहभागामुळे उपक्रमाचा विस्तार होत आहे.
उपक्रमातील मुले वस्ती भागातील आणि गरजू कुटुंबांतील आहेत. यामध्ये काही मुलांना आई नाही, काहींना वडील नाहीत, तर काहींच्या डोक्यावर आई-वडील दोघांचेही छत्र नाही. या मुलांचीही दिवाळी आनंदात साजरी व्हावी आणि त्यांना आपुलकीचा आधार मिळावा, या उद्देशाने मंडळ दरवर्षी हा कार्यक्रम आयोजित करते.आपल्या घरातील मुलांसाठी ज्या प्रेमाने आणि काळजीने कपडे खरेदी केले जातात, त्याच भावनेतून व्यापाऱ्यांनी या मुलांसाठी नवीन कपडे उपलब्ध करून दिले. तुळशीबागेचा गजानन परिवारातील सदस्यांनी मुलांची नावे आणि वयानुसार कपडे संकलित करण्याचे नियोजन केले. मुलांच्या अल्पोपाहाराची व्यवस्था मंडळाने केली होती.
























