दिनकर शिलेदार यांचा नाविन्यपूर्ण प्रयोग
marathinews24.com
पुणे – मराठी भाषेत दिवाळी अंकांना मोठी परंपरा आहे. त्या सोबतच आता इंग्रजी भाषेतील दिवाळी अंकाचाही आस्वाद वाचकांना घेता येणार आहे. ज्येष्ठ संपादक दिनकर शिलेदार यांच्या नाविन्यपूर्ण संकल्पनेतून दिनमार्क पब्लिकेशनतर्फे इंग्रजी भाषेतील भारतातील पहिलावहिला दिवाळी अंक सोमवारी (२ नोव्हेंबर) प्रकाशित झाला. पत्रकारांच्या हस्ते या ‘मी’ दिवाळी अंकाचे, तसेच मराठीतील लोकप्रिय व संग्राह्य ‘छंद’ या दिवाळी अंकाचेही पत्रकार संघात प्रकाशन करण्यात आले. प्रसंगी दिनकर शिलेदार यांच्याबरोबर लेखक अजय कुलकर्णी व सजावटकार रामदास वाकचौरे उपस्थित होते.
हवेलीची ‘दुष्काळ निवारण नियोजन आढवा बैठक संपन्न – सविस्तर बातमी
दिनकर शिलेदार म्हणाले, “जगभरातील व्यावसायिक ब्रँडची ओळख, त्यांची यशोगाथा मांडणारा हा अंक आहे. ब्रँड म्हणजे केवळ नाव, लोगो, उत्पादन किंवा बाजारपेठेतील स्थान नव्हे, तर दीर्घकाळ जपलेला विश्वास, गुणवत्ता, मूल्ये आणि समाजाप्रती असलेली बांधिलकी, हा विचार या अंकातून मांडण्यात आला आहे. उद्योजक, व्यावसायिक, संशोधक, नवकल्पना आणि नेतृत्व क्षेत्रात कार्यरत व्यक्तींचा प्रवास, त्यांचे अनुभव, संघर्ष आणि यशामागील भूमिका यांचा वेध या विशेषांकात घेण्यात आला आहे. ब्रँड निर्मितीचा विचार केवळ विपणनापुरता मर्यादित न ठेवता साहित्यिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातूनही त्याचा अभ्यास करण्याचा प्रयत्न या अंकात करण्यात आला आहे. याबरोबरच महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शताब्दी वर्षाच्या पार्श्वभूमीवर मराठी साहित्याची समृद्ध परंपरा आणि साहित्यिक संस्थांचे समाजातील योगदान यांचाही संदर्भ या अंकात महत्त्वाचा ठरतो.”
‘छंद’ दिवाळी अंकात यंदा निसर्ग आणि मानवी जीवन यांच्यातील अतूट नात्यावर विशेष भर देण्यात आला आहे. निसर्गसंवर्धन, पर्यावरणाचा समतोल, जैवविविधता, जलसंपदा, जंगल आणि मानवी जीवनशैली यांसारख्या विषयांचा विविध लेखांमधून वेध घेण्यात आला आहे. निसर्ग हा केवळ मानवी गरजा भागविण्याचे साधन नसून जीवनाचा अविभाज्य भाग आहे, हा विचार या अंकातून मांडण्यात आला आहे. अमेरिकन विचारवंत हेन्री डेव्हिड थोरो यांच्या निसर्ग विषयक विचारांचा संदर्भ तसेच भारतीय संस्कृतीतील निसर्गपूजेची परंपरा यांचा ऊहापोहही ‘छंद’मध्ये करण्यात आला आहे. पर्यावरणीय प्रश्नांकडे केवळ समस्यांच्या दृष्टिकोनातून न पाहता निसर्गाशी सुसंवादी जीवन जगण्याची प्रेरणा देण्याचा प्रयत्न या अंकातून करण्यात आला आहे. या अंकाच्या माध्यमातून वाचकांना निसर्गाकडे पाहण्याची नवी दृष्टी देईल अशी आम्हाला आशा आहे असे मत शिलेदार यांनी व्यक्त केले.
दोन्ही दिवाळी अंकांच्या माध्यमातून व्यावसायिक आणि साहित्यिक क्षेत्रातील विचारांची देवाणघेवाण तसेच निसर्गसंवर्धनाविषयी जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. परंपरेला आधुनिक विचारांची जोड देत वाचकांना नवे दृष्टिकोन देणारे हे दोन्ही अंक दिवाळीच्या साहित्यिक पर्वात वेगळेपण जपणारे ठरतील. इंग्रजी भाषेतील हा पहिलाच अंक लोकांच्या पसंतीस उतरेल, असा विश्वास दिनकर शिलेदार यांनी व्यक्त केला.
























