जिल्हाधिकाऱ्यांना तालुक्याच्या समावेशाबाबत निवेदन
marathinews24.com
पुणे – Haveli Drought Mitigation Plan : हवेली तालुक्यातील संभाव्य दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी पंचायत समिती हवेलीच्या वतीने विविध उपाययोजनांचा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. पंचायत समिती सभापती युवराज काकडे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (दि. २) रोजी आयोजित दुष्काळ निवारण नियोजन बैठकीत जलसंधारण, बंधाऱ्यांचे खोलीकरण, नवीन बंधारे उभारणी, ओढे-नाले खोलीकरण, वनराई बंधारे, विहीर व बोअरवेल पुनर्भरण यांसह विविध कामांवर चर्चा होऊन नियोजन केले. याकामांसाठी नाम फाउंडेशन व बायफ संस्थांनी सहकार्य करण्याची तयारी दर्शविली.
उद्योजकाची ‘वायप्लस’ सुरक्षा कोणाच्या शिफारशीवरून ? – सविस्तर बातमी
बैठकीस विविध शासकीय विभागांचे अधिकारी, पं.स. पदाधिकारी तसेच सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. लघुपाटबंधारे विभागाच्या माध्यमातून तालुक्यातील अस्तित्वातील बंधाऱ्यांचे खोलीकरण, नवीन बंधाऱ्यांची उभारणी, ओढे-नाल्यांचे खोलीकरण व अस्तरीकरण करण्याचे नियोजन करण्यात आले. कृषी विभागाने जलसंधारण व मृदसंधारणाच्या विविध योजनांची माहिती दिली. तालुक्यातील प्रत्येक गावात शाळा, महाविद्यालये आणि तरुण मंडळांच्या सहभागातून वनराई बंधारे उभारण्यात येणार आहेत. तसेच सर्व शासकीय इमारतींमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग व्यवस्था करण्याचा निर्णय घेण्यात आला.
पाणी व्यवस्थापन, जलसंधारण, मृदसंधारण आणि चारा व्यवस्थापनाबाबत जनजागृती करण्यासाठी जिल्हा परिषद शाळा व महाविद्यालयांमध्ये तालुकास्तरीय निबंध, चित्रकला आणि वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत. विजेत्यांना सभापती व गटविकास अधिकारी यांच्या स्वाक्षरीची प्रमाणपत्रे आणि पारितोषिके देण्यात येणार आहेत. चारा व्यवस्थापनाच्या दृष्टीने सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन यांनी शासकीय योजनांची माहिती दिली. १७ राज्ये आणि २७ जिल्ह्यांत कार्यरत असलेल्या बायफ संस्थेचे शास्त्रज्ञ डॉ. मनोज कुमार आवारे यांनी संस्थेच्या संशोधन कार्याची माहिती देत चारा व्यवस्थापन व पशुधन संवर्धनाबाबत मार्गदर्शन केले.
नाम फाउंडेशनचे मल्हार नानासाहेब पाटेकर यांनी तालुक्यातील जलसंधारणाच्या कामांसाठी जेसीबी यंत्र नाममात्र दरात उपलब्ध करून देण्याबाबत सांगितले. आदर पूनावाला फाउंडेशनच्या प्रतिनिधींनी शुद्ध पाणीपुरवठ्याबाबत माहिती देत विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभागाचे आश्वासन दिले.
जमिनीमध्ये नैसर्गिकरीत्या पाण्याचे पुनर्भरण व्हावे, या उद्देशाने ‘जलतारा’ प्रकल्प राबविण्यात येणार आहे. Haveli Drought Mitigation Plan पंचायत समिती हवेल व कृषी उत्पन्न बाजार समिती, पुणे तसेच नाम फाउंडेशनच्या सहकार्याने हा प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे. पुढील आठवड्यापासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती सभापती युवराज काकडे यांनी दिली. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समितीचे सदस्य तसेच पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत याचा शुभारंभ होणार आहे.
सभापती युवराज काकडे, उपसभापती विद्या गायकवाड, गटविकास अधिकारी शेखर शेलार, नाम फाउंडेशनचे मल्हार नानासाहेब पाटेकर, आदर पुनावाला क्लीन सिटीचे व्यवस्थापक मल्हार करवंदे, बायफ संस्थेचे शास्त्रज्ञ डॉ. मनोज कुमार आवारे, जि. प. सदस्य रूपाली रमेश कोंडे, किरण साकोरे
पं. स. सदस्य सुदर्शन चौधरी, मनोज चौधरी, युवराज वांजळे, सुषमा मुरकुटे, राणी वाळके, मोनिका कंद, शुभांगी खिरीड, कोमल गणेश कांबळे, अमोल टेकाळे यांच्यासह कृषी, लघू पाटबंधारे, बांधकाम, पशूसंवर्धन, नरेगा विभागाचे अधिकारी उपस्थित होते. बैठक संपल्यानंतर उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी जितेंद्रजी डुडी यांची भेट घेऊन, हवेली तालुक्याचा समावेश दुष्काळग्रस्त तालुक्यात करणे संदर्भातील निवेदन दिले.
























