जत येथे पुरस्कार वितरण सोहळ्यात केले जनतेला आवाहन
marathinews24.com
सांगली – समाजात किती विषमता होती हे पहायचे असल्यास खा. डॉ. अमोल कोल्हे यांची महात्मा जोतिबा फुले मालिका अवश्य पहा असे आवाहन आ. जयंतराव पाटील यांनी केले. ते जत येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलत होते.
आ. जयंतराव पाटील म्हणाले की, अगदी काही दिवस शाळा शिकलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य २७ भाषांमध्ये भाषांतरीत होते म्हणजे त्या साहित्याची उंची काय असेल हा विचार आपण केला पाहिजे. त्यांच्या योगदानाला वंदन म्हणूनच आम्ही उरूण ईश्वरपूर शहरात त्यांचा पुतळा उभारत आहोत.
स्व. राजारामबापू आणि अण्णाभाऊंचे जिव्हाळ्याचे संबंध होते. अण्णाभाऊ साठे यांनी एक पुस्तक देखील राजाराम बापूंना अर्पण केले आहे. मुंबईत जाऊन त्यांनी मिल कामगारांच्या साथीने उभे राहिले. त्यांनी समजतील विषमतेवर, दुर्गुणांवर प्रकाश टाकला. त्यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा यासाठी अनेकांनी पाठिंबा दिलेला आहे.
समाजात किती विषमता होती हे पहायचे असल्यास खा. डॉ. अमोल कोल्हे यांची महात्मा जोतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जीवनावर आधारित सीरियल YouTube वर आवर्जून पाहा. समाजात मनुवादाने विषमता पेरली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचे दहन केले, ही घटना साधी नाही. पुढच्या वर्षी या घटनेला शंभर वर्ष पूर्ण होत आहे. पुन्हा एकदा मनुस्मृतीचे दहन करू. हेच या महात्म्यांसाठीचे अभिवादन ठरेल. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी पतीच्या निधनानंतर चाल करू पाहणाऱ्या पेशव्यांना आपल्या ताकदीने माघार घ्यायला लावली. हा आपला इतिहास आहे. मात्र आज समाज इतका मूक का झाला आहे? पैशाचा प्रभाव प्रचंड वाढला आहे. देश धनदांडग्यांच्या हाती गेला आहे. तुमच्या एका मताची ताकद संपूर्ण व्यवस्था बदलू शकते.
स्पर्धा परीक्षेत स्पर्धा नाही तर वशिलेबाजी, पेपरफुटी सुरू आहे. या रागाने तरुण मुले रस्त्यावर उतरली. राजीनामा घेतल्याशिवाय आंदोलन थांबवले नाही, हा त्यांचा विजय आहे. शिक्षित समाजात पुढे जाण्याची ताकद आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे विदेशात जाऊन बॅरिस्टर झाले, भारतात येऊन त्यांनी घटना लिहिली. त्यांचे नाव या देशातून, या जगातून कधीच पुसले जाणार नाही. आजच्या तरुण पिढीला माझे आवाहन आहे की तुम्ही देखील अशीच कामगिरी करा.
या सोहळ्यात विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्यात आले. यावेळी माजी मंत्री महादेव जानकर, माजी आमदार विलासराव जगताप, विक्रम सावंत, विद्या मोटे, प्रा. सुकुमार कांबळे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे आयोजन अविनाश वाघमारे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले होते.






















