कोंढव्यातील प्रकार; दोघांवर गुन्हा
marathinews24.com
पुणे – Kondhwa Crime : ओळखीच्या महिलेला आईस्क्रीम देण्यासाठी गेलेल्या तरुणावर लोखंडी हत्याराने हल्ला करण्यात आल्याची घटना कोंढवा खुर्द येथील शिवनेरीनगर परिसरात घडली. या हल्ल्यात तरुणाच्या उजव्या डोळ्यावर तसेच डाव्या हातावर तीन ते चार वार झाल्याने तो गंभीर जखमी झाला. याप्रकरणी प्रेम गायकवाड आणि त्याच्या साथीदाराविरुद्ध कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ओंकार शैलेश अवचिते (वय २६, रा. शिवगंगा हाईट, शिवनेरीनगर, कोंढवा खुर्द) यांनी फिर्याद दिली आहे.
जागा नावावर करण्यासाठी ७७ वर्षीय आजोबांना मारहाण – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २९ सप्टेंबर रोजी मध्यरात्रीनंतर साडेबारा वाजता शिवगंगा हाईटच्या पार्किंगमध्ये ही घटना घडली. आरोपी प्रेमच्या नातेवाईक महिलेशी ओंकारची ओळख आहे. तिने मेसेज करून आईस्क्रीम आणण्यास सांगितल्याने ओंकार तिच्या घरी गेला. दारातून आईस्क्रीम देत असताना प्रेमने त्याला पाहिले आणि त्याच्या कानावर मारले. त्यानंतर ओंकार तेथून निघून इमारतीच्या पार्किंगमध्ये जाऊन बसला. काही वेळाने प्रेम आणि त्याचा साथीदार तेथे आले. दोघांनी त्याच्यावर लोखंडी हत्याराने हल्ला केल्याचा आरोप आहे. यावेळी त्याच्या डोळ्यावर व हातावर तीन ते चार वार करण्यात आले. हल्ल्यानंतर आरोपी पसार झाले.
आर्टिस्टला दगडाने मारहाण; जुन्या वादातून हल्ला
हडपसरमधील हांडेवाडी रोडवरील श्रीराम चौकात जुन्या वादातून टॅटू आर्टिस्टला दगडाने आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. हल्ल्यात त्याच्या डोक्याला व कानाला दुखापत झाली. तसेच त्याच्या भावाच्या दुचाकीचेही नुकसान करण्यात आले. कुणाल खलसे (वय २७, रा. चिंतामणीनगर, हडपसर) आणि तीन अनोळखी व्यक्तींविरुद्ध काळेपडळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. गणेश मोहन दिघे (वय २९, रा. नमो विहार सोसायटी, फ्लॅट क्रमांक २०२, ए विंग, सातवनगर, हडपसर) यांनी फिर्याद दिली. दि. २८ सप्टेंबर रोजी रात्री नऊच्या सुमारास श्रीराम चौकात ही घटना घडली.
जुन्या वादाचा राग मनात धरून आरोपींनी संगनमत केले. कुणालने पाठीमागून येत दिघे यांच्या डोक्यात दगड मारला. त्याच्या तीन साथीदारांनीही डोक्यावर व कानावर दगडाने हल्ला केला. त्यानंतर लाथा बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. तसेच दिघे यांच्या भावाच्या दुचाकीच्या पुढील भागावर दगड मारून नुकसान केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. आरोपींना अद्याप अटक झाली नाही. पोलिस उपनिरीक्षक पाटील तपास करीत आहेत.






















