पुण्यात रस्त्यांवर मोबाईल चोरांची दहशत
marathinews24.com
पुणे – पादचाऱ्यांकडील मोबाइल हिसकाविणाऱ्या चोरट्यांनी उच्छाद मांडला आहे. पुणे स्टेशन परिसरात एका प्रवासी तरुणीच्या हातातील मोबाइल संच चोरट्याने हिसकावून नेला, तसेच जुन्या मुंबई-पुणे रस्त्यावर वाकडेवाडी भागात एकाला चाकूचा धाक दाखवून त्याच्याकडील मोबाइल संच हिसकावून नेण्यात आला. याप्रकरणी खडकी पोलिसांनी दोन चोरट्यांना अटक केली.
कौटुंबिक वादातून साडूचा केला खून, मृतदेह वरंधा घाटात फेकला – सविस्तर बातमी
पुणे स्टेशन परिसरातील मोबाइल चोरी प्रकरणी एका तरुणीने बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या मााहितीनुसार, तक्रारदार तरुणी उंड्रीतील एका सोसायटीत राहायला आहे. सोमवारी (५ मे) तरुणी परगावाहून पुणे रेल्वे स्टेशन परिसरात रात्री बाराच्या सुमारास आली. स्टेशनच्या आवारात प्रवासी वाहतूक करणाऱ्या मोटारीची वाट ती पाहत थांबली होती. प्रवासी मोटारीची मोबाइलवरुन ती नोंदणी करत होती. त्या वेळी चोरट्याने तरुणीच्या हातातील २० हजार रुपयांचा मोबाइल संच हिसकावून नेला. तरुणीने आरडाओरडा केला. पसार झालेल्या चोरट्याचा माग काढण्यात येत असून, सहायक पोलीस निरीक्षक माेहिते तपास करत आहेत.
दुसऱ्या एका घटनेत जुन्या मुंबई-पुणे रस्त्यावरील वाकडेवाडी भागात एकाला चाकूचा धाक दाखवून त्याच्याकडील २० हजार रुपयांचा मोबाइल संच हिसकावून नेण्यात आल्याची घटना मंगळवारी (६ मे) सायंकाळी घडली. याबाबत एकाने खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार मूळचे धुळे जिल्ह्यातील शिरपूरचे रहिवासी आहेत. सध्या ते खडकीतील मुळा रोड भागात वास्तव्यास आहेत.
मंगळवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास ते वाकडेवाडी परिसरातून निघाले होते. कामगार आयुक्त कार्यालय परिसरात दोघांनी त्यांना चाकूचा धाक दाखवून मोबाइल संच हिसकावून नेला. तक्रारदाराने पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी तपास करुन पसार झालेले चोरटे अश्फाक शेख (वय २४, रा. आदर्शनगर, बोपाेडी), समीर अब्दुल शेख (रा. मीठानगर, कोंढवा) यांना अटक केली. पोलीस उपनिरीक्षक चौगुले तपास करत आहेत.