एस.एम. जोशी पुलावर सुरू आहे आंदोलन
marathinews24.com
पुणे – MPSC Student Protest : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाविरोधात सुरू असलेल्या एस. एम. जोशी पुलावरील आंदोलनाला दुसऱ्यांदा पोलिसांनी परवानगी नाकारली असून, पोलिसांनी आंदोलकांना जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ अथवा, बंडगार्डन परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथील उद्यान परिसर अशा दोन जागांचे पर्याय दिले आहेत. दरम्यान, गुरूवारी आंदोलनास्थळी माईकद्वारे आंदोलकांनी जागा सोडावी, अशी सूचना देखील पोलिसांनी केली. मात्र, आंदोलकर्त्यांनी रात्रीपर्यंत आंदोलनाची जागा सोडली नव्हती.
लोणावळ्यात वेट‘एन जॉयमध्ये ‘ग्लो गार्डन सुरु – सविस्तर बातमी
एमपीएससी आयोगाविरोधात गेल्या सहा दिवसांपासून एस. एम. जोशी पुलावर विद्यार्थ्यांकडून आंदोलन सुरू आहे. आंदोलनाविरोधात पुण्यातील रहिवासी अमित सुपेकर व सौरभ विरकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याचिकेवर बुधवारी सुनावणी झाली. मुंबई उच्च न्यायालयाने विद्यार्थी समाजकंटक नव्हेत, असे म्हणत सार्वजनिक भरती परीक्षा निष्पक्ष व पारदर्शक पद्धतीने घेण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे, असे स्पष्ट केले. (MPSC Student Protest) न्यायालयाने विद्यार्थ्यांना देखील आंदोलन मागे घेऊन पुन्हा अभ्यासाकडे वळण्याचे आवाहन केले. तर, विद्यार्थ्यांना कुटुंबियांचा विचार करून रस्त्यावरील आंदोलनामुळे करिअरवर परिणाम होऊ शकतो, अशी चिंताही व्यक्त केली. ‘पुणे हे शांतताप्रिय शहर असून आंदोलनामुळे शहरातील नागरिकांना त्रास होणार नाही, याचीही काळजी विद्यार्थ्यांनी घ्यावी,’ असेही न्यायालयाने नमूद केले होते.
न्यायालयाने राज्य सरकारला एमपीएससीच्या परीक्षा प्रक्रियेबाबत पुढील कार्यवाहीचा रोडमॅप ३ आठवड्यांत सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. याप्रकरणाची पुढील सुनावणी २५ नोव्हेंबरला होणार आहे. नंतर आंदोलकांकडून आंदोलन करण्यास दुसऱ्यांदा परवानगी मागण्यात आली होती. गुरूवारी पुणे पोलिसांनी ही परवानगी नाकरली. तसेच, आंदोलक विद्यार्थ्यांना आंदोलनाची जागा सोडावी, असे पुणे पोलिसांनी दिवसभर अशी सूचना केली. परंतु, विद्यार्थ्यांनी आंदोलनाची जागा रात्रीपर्यंत सोडली नव्हती.





















