उल्लेखनीय सेवेबद्दल सन्मान
marathinews24.com
पुणे – प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पोलीस दलातील उल्लेखनीय सेवेबद्दल लाचलुचपत प्रतिबंधक पुणे विभागाचे पोलीस उपअधीक्षक दयानंद गावडे, पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, पोलीस निरीक्षक महेंद्र कोरे, राज्य राखीव दलातील सहायक पोलीस उपनिरीक्षक प्रदीप साहेबराव सावंत यांना राष्ट्रपतींचे पोलीस पदक जाहीर झाले. येरवडा कारागृहातील हवालदार राजेंद्र धनगर, हवालदार सुनील लांडे यांना राष्ट्रपतींचे पदक जाहीर झाले आहेत.
बारामती मतदारसंघातील कर्मचाऱ्यांचे निवडणूक प्रशिक्षण संपन्न – सविस्तर बातमी
प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभरातील पोलीस, अग्निशमन, गृहरक्षक दलातील जवान, तसेच कारागृह सेवेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना उल्लेखनीय आणि प्रशंसनीय कामगिरीबद्दल राष्ट्रपतींचे पोलीस पदक जाहीर करण्यात येते. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला देशभरातील ९८२ पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना पदके जाहीर करण्यात आली.
दयानंद गावडे मूळचे सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात असलेल्या गणवरे गावचे आहेत. १९९६ मध्ये ते पोलीस उपनिरीक्षक म्हणून रूजू झाले. मुंबई परिसरात १२ वर्षे त्यांनी सेवा बजाविली. त्यानंतर रायगड, सोलापूर आणि पुणे ग्रामीण पोलीस दलात काम केले.
तर अविनाश शिळीमकर पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील तांबड गावचे आहेत. १९९३ मध्ये ते पोलीस दलात उपनिरीक्षक पदावर रुजू झाले. त्यानंतर मुंबई शहर, सातारा, नागपूर शहर गुन्हे शाखा, अहिल्यानगर विशेष शाखेत त्यांनी काम केले. शिळीमकर हे सध्या पुणे ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत. शिळीमकर आणि पथकाने अनेक गंभीर गु्न्ह्यांचा छडा लावला.
लोणी काळभोरमधील गुंड अप्पा लोंढे टोळीविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाई, तसेच नागपूर शहरात खून, दरोडा, खंडणी असे गंभीर स्वरुपाचे ३८ गुन्हे शिळीमकर यांनी उघडकीस आणले होते. नागपूरमधील राजा गौस टोळी, तसेच संतोष आंबेकर टोळीविरुद्ध त्यांनी कारवाई केली होती.
उल्लेखनीय सेवेबद्दल पोलीस निरीक्षक महेंद्र कोरे, सहायक पोलीस उपनिरीक्षक प्रदीप सावंत, कारागृहातील हवालदार राजेंद्र धनगर, सुनील लांडे यांना राष्ट्रपतींचे पोलीस पदक जाहीर झाले आहे.
























