चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – दुकानाचे कुलूप तोडून चोरट्यांनी गल्ल्यातील तीन लाख रुपयांची रोकड चोरुन नेल्याची घटना लष्कर भागात घडली. या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत मोहम्मद जाफर चहावाला (वय ५०, रा. हर्मेस हाऊस, काॅन्व्हेंट स्ट्रीट, लष्कर) यांनी लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चहावाला यांचे लष्कर भागातील श्री छत्रपती शिवाजी महाराज मार्केट परिसरात चहा पावडर विक्रीचे दुकान आहे. रविवारी (२५ ऑक्टोबर) मध्यरात्री चोरट्यांनी दुकानाच्या पाठीमागील बाजूस असलेली लोखंडी जाळी उचकटली. जाळी उचकटल्यानंतर चोरट्यांनी दुकानाचे कुलूप तोडले. दुकानात प्रवेश केल्यानंतर गल्ल्यातील तीन लाख रुपयांची रोकड चोरुन नेली. रविवारी सकाळी दुकानातील रोकड चोरीला गेल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस आयुक्त शैलेश संखे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज हांडे यांनी घटनास्थळी भेट दिली.
पसार झालेल्या चोरट्यांचा शोध घेण्यात येत असून, पोलीस उपनिरीक्षक शिंदे तपास करत आहेत. मार्केट यार्डमधील भुसार बाजारात असलेल्या सुकामेव्याच्या दुकानातून सहा लाखांची रोकड चोरुन नेल्याची घटना नुकतीच घडली. त्यानंतर लष्कर भागातील एका दुकानाचे कुलूप तोडून रोकड चोरीची घटना उघडकीस आली. दिवाळीच्या तोंडावर दुकानांचे कुलूप तोडून रोकड चोरीच्या दोन घटना घडल्या.
कोथरूडमधील नियोजित गृहप्रकल्पातून ७ लाखांची वायर चोरीला
नियोजित गृहप्रकल्पाच्या आवारातून चोरट्यांनी सात लाख रुपयांची वायर चोरुन नेल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध कोथरूड पोलिसांनी गुन्हा दाखल केला.याबाबत श्रीकांत सिद्धू यादव (वय ३६, रा. निकम चाळ, कर्वेनगर) यांनी कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोथरूडमधील उजवी भुसारी काॅलनी परिसरात न्यू इंडिया स्कूलजवळ एका गृहप्रकल्पाचे काम सुरू आहे. यादव हे इलेक्ट्रिशयन आहेत. नियोजित गृहप्रकल्पातील सहाव्या आणि सातव्या मजल्यावरील सदनिकेत विद्युतविषयक कामांसाठी लागणारी वायर ठेवण्यात आली होती. चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडून सात लाख रुपयांची वायर चोरुन नेल्याची घटना रविवारी (२५ ऑक्टोबर) सकाळी उघडकीस आली. पोलीस उपनिरीक्षक चव्हाण तपास करत आहेत.
























