सिलिंडरचा स्फोट; १ लाख रुपयांचे नुकसान, सुदैवाने जीवितहानी नाही
marathinews24.com
पुणे – Pune Fire News : गॅस गळतीमुळे लागलेल्या आगीत कामगाराच्या घरातील संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. कोथरूडमधील एकलव्य कॉलेजजवळ बी. जे. काळे डेव्हलपर्सच्या परिसरात मंगळवारी सकाळी ही घटना घडली. आगीमुळे शेजारील इमारतीतील काही घरांच्या खिडक्यांच्या काचाही फुटल्या. या घटनेत सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाले असून, सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही.
पुण्यात हॉटेलमध्ये वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश; दोन परराज्यातील महिलांची सुटका – सविस्तर बातमी
मंगळवारी सकाळी ८ वाजून ५२ मिनिटांनी कामगारांच्या घरांना आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाला मिळाली. त्यानुसार कोथरूड अग्निशमन केंद्राचे जवान घटनास्थळी दाखल झाले. स्वयंपाकाच्या गॅसची गळती होऊन एका कामगाराच्या घरात आग लागल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. आगीची तीव्रता लक्षात घेऊन जवानांनी आणखी एका अग्निशमन गाडीची मदत घेतली.
आगीवर पाण्याचा मारा सुरू असताना तापलेल्या एलपीजी सिलिंडरचा स्फोट झाला. त्यानंतर जवानांनी दोन पाण्याच्या वाहिन्यांच्या साहाय्याने आगीवर सातत्याने पाण्याचा मारा करून ती पूर्णपणे विझवली. तसेच, घरातील आणखी एक नियमित आकाराचा आणि पाच किलो वजनाचे चार एलपीजी सिलिंडर बाहेर काढून संभाव्य धोका टाळला.
आगीत घरातील सर्व संसारोपयोगी साहित्य, कपडे आणि एक एलपीजी सिलिंडर जळून नुकसान झाले. तसेच, सिलिंडरच्या स्फोटामुळे शेजारील इमारतीतील काही घरांच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या. या घटनेत सुमारे एक लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याची माहिती संबंधितांकडून देण्यात आली. कोथरूड आणि एनडीए अग्निशमन केंद्रांच्या जवानांनी ही कामगिरी केली. प्रभारी अधिकारी सचिन शिंदे यांच्यासह अग्निशमन जवान सूरज माने, संतोष भोसले, आदर्श शिंदे, चंद्रकांत गावडे, संकेत कारंडे आणि शिवकुमार माने यांनी आग विझविण्याच्या कामात सहभाग घेतला.





















