बसची काच फोडणाऱ्या तिघांविरुद्ध गु्न्हा
marathinews24.com
पुणे – पीएमपीएल बसचालकाला पट्ट्याने मारहाण करण्यात आल्याची घटना हडपसर परिसरात घडली. दुचाकीवरील तिघांनी बस अडवून काच फोडली. याप्रकरणी तिघांविरुद्ध हडपसर पोलिसांकडून सरकारी कामात अडथळा आणणे, तसेच मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बँक खाते अद्ययावत करण्याची बतावणी; सायबर चोरट्यांकडून ज्येष्ठ महिलेची फसवणूक – सविस्तर बातमी
याबाबत बसचालक नितीन गुरुनाथ खडके (वय ३५, रा. आदर्शनगर, मोशी) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दुचाकीवरील तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीएमपी चालक खडके हडपसर-सासवड रस्त्याने गुरुवारी (१ मे) निघाले होते. सातववाडी परिसरात दुचाकीवरुन आलेल्या तिघांनी बस अडविली. बस का जोरात चालविली, अशी विचारणा करुन त्यांनी बसचालक खडके यांना पट्ट्याने मारहाण केली. त्यांच्याकडील मोबाइल संच घेऊन आपटला, तसेच बसमधील अग्नीरोधक उपकरण काचेवर मारल्याने काच फुटली. खडके यांना मारहाण करुन दुचाकीवरील तिघे जण पसार झाले. पोलीस उपनिरीक्षक शेख तपास करत आहेत.