लक्ष्मी रस्ता, तुळशीबाग, मंडईसह व्यापारी पेठेत १२ नोव्हेंबरपर्यंत निर्बंध
marathinews24.com
पुणे – दिवाळीत मध्य भागातील लक्ष्मी रस्ता, शनिपार, महात्मा फुले मंडईसह व्यापारी पेठेत खरेदीसाठी होणारीp गर्दी विचारात घेऊन वाहतूक पोलिसांनी दिवसा मालवाहू वाहनांना बंदी घातली आहे. मालवाहतूकदारांनी रात्री नऊ ते सकाळी नऊ या वेळेत वाहने घेऊन व्यापारी पेठेत यावे, असे आदेश वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त डाॅ. संदीप भाजीभाकरे यांनी दिले आहेत.
दिवाळीत खासगी बसने भाड्यापेक्षा अधिक आकारणी केल्यास कारवाई होणार – सविस्तर बातमी
‘दिवाळीत लक्ष्मी रस्ता, कुमठेकर रस्ता, टिळक रस्ता, बाजीराव रस्ता, महात्मा फुले मंडई, शनिपार, तुळशीबाग, रविवार पेठेतील बोहरी आळी, गमेश पेठ, शुक्रवार पेठ, बुधवार पेठेतील पासोड्या विठोबा चौक, मोती चौक, तपकीर गल्ली परिसरात खरेदीसाठी गर्दी होते. कपडे, तसेच अन्य वस्तू खरेदीसाठी व्यापारी पेठेत शहर, तसेच उपनगरातील नागरिक गर्दी करतात. व्यापारी पेठेत दिवसा मालवाहू वाहनांतील मालाची ने-आण केल्यास वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता आहे. यापार्श्वभूमीवर मध्य भागातील व्यापारी पेठेत दिवसा मालवाहू वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. १२ नोव्हेंबरपर्यंत हे आदेश लागू राहणार आहेत’, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त डाॅ. भाजीभाकरे यांनी दिली.
व्यापारी पेठेत दिवसा मालवाहू वाहनांना बंदीचे आदेश सोमवारपासून (२६ ऑक्टोबर) लागू करण्यात आले आहेत. माल वाहतूकदारांनी त्यांच्या वाहनाताली माल रात्री नऊ ते सकाळी नऊ या वेळेत उतरावा’, असे आवाहन त्यांनी पोलीस उपायुक्त भाजीभाकरे यांनी केले आहे.























