कौटुंबिक छळाचा नातेवाईकांचा आरोप, परिसरात तणाव
marathinews24.com
पुणे – Pune Woman Suicide Case : कौटुंबिक कारणातून प्रसिद्ध व्यावसायिक बाळासाहेब झांबरे यांच्या सुनेने गळफास घेउन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी (दि. २) सकाळी साडेअकराच्या सुमारास मुकूंदनगरात उघडकीस आली. घटनेनंतर संतप्त नातेवाईकांनी मंगल कार्यालयासह घराची तोडफोड केली. त्यामुळे काही काळ परिसरातील वातावरण तणावाचे झाले होते. सोमवारी सकाळी हा प्रकार समोर आला असून, याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदीचे काम सुरू होते. पायल अक्षय झांबरे (वय २९, रा. मुकूंदनगर, सहकारनगर) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे.
पुण्यात दिवाळीच्या पार्श्वभूमीवर दक्षता अन सुरक्षा- पोलीस आयुक्त अमितेश कुमार – सविस्तर बातमी
पायल आणि अक्षयचे काही वर्षांपुर्वी लग्न झाले होते. त्यांना तीन वर्षांची मुलगी आहे. पायलने एमबीएचे शिक्षण घेतले असून, खेडशिवापूरमधील व्यावसायिक तसेच नक्षत्र पॅलेसचे मालक पवार यांची ती मुलगी होती. कौटुंबिक कारणावरून त्यांना त्रास दिला जात होता, असा आरोप नातेवाईकांनी केला आहे. रविवारी (दि.१) पायलचे सासूसोबत वादविवाद झाले होते. त्यानंतर पायलने दुसर्या ठिकाणी असलेल्या फ्लॅटवर जाऊन गळफास घेउन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी सकाळी साडे अकराच्या उघडकीस आली.
मुलीच्या आत्महत्येची माहिती मिळताच पायल हिच्या माहेरीकडील नातेवाईकांनी थेट मुकूंदनगर येथे धाव घेतली. संतप्त नातेवाईकांनी झांबरे यांच्या घरासह कार्यालयाची तोडफोड केली. प्रचंड गोंधळ घातल्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. झांबरे कुटूंब हे प्रसिद्ध व्यावसायिकांपैकी एक आहेत. त्यांची कार्यालये, हॉटेल्स असून, ते बांधकाम व्यवसायात देखील सक्रिय असल्याची माहिती आहे. दरम्यान, याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत स्वारगेट ठाण्यात गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते.
























