‘भ्रातृमंडळ, पुणे’तर्फे रक्तदान व मोफत आरोग्य तपासणी शिबिर यशस्वी
marathinews24.com
पुणे – भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्मृतिनिमित्त ‘भ्रातृमंडळ, पुणे’तर्फे वारजे येथे आयोजित करण्यात आलेले रक्तदान व मोफत आरोग्य तपासणी शिबिर यशस्वीरित्या पार पडले. रविवारी ( दि.१२) सकाळी ८ ते दुपारी १ या वेळेत झालेल्या या शिबिरात मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग घेतला. शिबिरात ९५ दात्यांनी रक्तदान करून समाजसेवेचा आदर्श उभारला. शिबिरादरम्यान नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणीचेही आयोजन करण्यात आले होते.
पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ – सविस्तर बातमी
डॉ. आशुतोष पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून नेत्र तपासणी करण्यात आली, तर डॉ. सुरेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अस्थिरोग व बीएमडी (हाडांची घनता) तपासणी करण्यात आली. यावेळी मंडळाचे सचिव नरेंद्र महाजन, खजिनदार जितेंद्र भारंबे, माजी अध्यक्ष रविन्द्र चौधरी, डॉ. सुरेंद्र पाटील,डॉ. योगेश नारखेडे, डॉ. आशुतोष पाटील, कार्यकारिणी सदस्य चंद्रकांत नेमाडे, आरती टोके, प्रतिभा राणे, मुरली खर्चे, सुशील नारखेडे व अनेक रक्तदाते उपस्थित होते.यासाठी ससून रक्त सेवा केंद्राचे अधीक्षक (वैद्यकीय) शरद देसले व तेथील डॉक्टरांचे उत्तम सहकार्य लाभले.
अस्थिरोग व हाडांची घनता तपासणीचा १०० लोकांनी व नेत्र तपासणीचा ८० लोकांनी लाभ घेतला..रक्तदात्यांसाठी नाश्ता आणि स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. भ्रातृ मंडळाचे पदाधिकारी आणि स्वयंसेवकांनी शिबिर यशस्वी करण्यासाठी मोठे योगदान दिले. या उपक्रमाचा उद्देश समाजात आरोग्य जागरूकता वाढवणे आणि रक्तदानाच्या माध्यमातून जीवनदायी संवेदना निर्माण करणे हा असल्याचे संस्थेच्या प्रतिनिधींनी सांगितले. सामाजिक उपक्रमास वारजे परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून, भविष्यातही अशा उपक्रमांचे आयोजन नियमितपणे करण्यात येईल, असे भ्रातृमंडळ, पुणे तर्फे कळविण्यात आले आहे.























