सायबर चोरट्याने तीन दिवसांत लुटले
marathinews24.com
पुणे – पोलीस असल्याची बतावणी करीत सायबर चोरट्याने जेष्ठ नागरिकाला तब्बल १ कोटी ५ लाखांचा ऑनलाईन गंडा घातला आहे. ही घटना २५ ते २८ जुलै २०२६ कालावधीत सहकारनगरमध्ये घडली आहे. याप्रकरणी ७२ वर्षीय जेष्ठाने सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार मोबाइलधारक, बँकधारकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तपासाच्या नावाखाली पुणे पोलिसांचे पर्यटन – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे जेष्ठ नागरिक असून, सहकारनगर मध्ये राहायला आहेत. २५ जुलैला सायबर चोरट्याने त्यांना फोन करून पोलीस बोलत असल्याची बतावणी केली. तुमच्या आधारकार्ड, डेबीटकार्डचा वापर मनी लॉड्रींगमध्ये झाला आहे. तुम्हाला अटक होउ शकते, अशी भीती दाखवून सायबर चोरट्याने त्यांना ईडी, सीबीआय, सर्वोच्च न्यायालय, हिंदुस्थान सरकारची लेटरहेड असलेली पत्रे पाठवली. त्यामुळे जेष्ठाचा विश्वास संपादित झाला.
संबंधित प्रकरणात तपासात सहकार्य करण्यास सांगून, सायबर चोरट्यांनी तक्रारदाराला बँकखात्यासह फिक्स डिपॉजिट असलेली रक्कम वर्ग करण्यास सांगतली. त्यानुसार जेष्ठाने अवघ्या तीन दिवसांत तब्बल १ कोटी ५ लाख रूपये साबयर चोरट्याच्या बँकखात्यात वर्ग केले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदाराने पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी तत्काळ गुन्हा दाखल करण्यात आला असून, संबंधित बँकखाते गोठवण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे तपास करीत आहेत.
























