काळेपडळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – शहरातील हांडेवाडीतील तरुणाचा खून प्रकरणाचा छडा पोलिसांनी दोन तासात लावला. खून करुन पसार झालेल्या एकाला काळेपडळ पोलिसांनी अटक केली. आकाश मारुती झांबरे (वय ३१, रा. झांबरे तालीम चौक, होळकरवाडी, ता. हवेली) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी आकाश उर्फ आत्या अशोक भरेकर (वय ३१, रा. झांबरे तालीम चौक, होळकरवाडी, ता. हवेली) याला अटक करण्यात आली. याबाबत झांबरे याचा चुलतभाऊ रवींद्र जालिंदर झांबरे यांनी काळेपडळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पुण्यात नवीन पोलिस चौक्यांची होणार स्थापना – सविस्तर बातमी
पोलिसोनी दिलेल्या माहितीनुसार, कात्रज-हडपसर बाह्यवळण मार्गावरील हांडेवाडी भागात एका सोसयाटीजवळ असलेल्या मोकळ्या जागेत तरुण मृतावस्थेत पडल्याची माहिती शनिवारी (२० जून) सकाळी पोलिसांना मिळाली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त गौहर हसन, परिमंडळ सहाचे पोलीस उपायुक्त जीवन बेनीवाल, सहायक आयुक्त अतुलकुमार नवगिरे, राजेंद्र मुळीक, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीषा निंबाळकर यांनी घटनास्थळी भेट दिली. गु्न्हे शाखा आणि काळेपडळ पोलीस ठाण्यातील पथकांनी तपास सुरु केला. तपासात मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी संशयावरुन भरेकर याला ताब्यात घेतले. चौकशीत भरेकर याने झांबरे याचा खून केल्याची कबुली दिली. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. खुनामागचे निश्चित कारण समजू शकले नाही. भरेकर याची पोलिसांकडून चौकशी करण्यात येत आहे. पोलीस निरीक्षक विलास सुतार तपास करत आहेत.
बिबवेवाडीत भरदिवसा घरफोडी
भरदिवसा सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने, रोकड असा पावणेदोन लाख रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना बिबवेवाडी भागातील एका सोसायटीत घडली. याबाबत एकाने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रादार तरुण आणि कुटुंबीय हे बिबवेवाडीतील गणेशपूजा सोसायटीत राहायला आहेत. शनिवारी (२० जून) सकाळी साडेदहाच्या सुमारास तक्रारदार तरुण आणि कुटुंबीय हे सदनिका बंद करुन कामानिमित्त बाहेर पडले. चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडले. शयनगृहातील कपाट उचकटून चोरट्यांनी सोन्याचे दागिने आणि ९५ हजारांची रोकड असा एक लाख ७७ हजार रुपयांचा ऐवज लांबविला. दुपारी दोनच्या सुमारास तक्रारदार घरी परतले. तेव्हा सदनिकेत चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी सातपुते यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी सोसायटीच्या परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण ताब्यात घेतले असून, पोलिसांकडून चोरट्यांचा शोध घेण्यात येत आहे. पोलीस उपनिरीक्षक महेश जगताप तपास करत आहेत.





















