कुख्यात घायवळविरूद्ध १०, आंदेकरविरूद्ध १३ गुन्हे

दोन टोळ्यांचे मोडले कंबरडे

marathinews24.com

पुणे – शहरातील कायदा सुव्यवस्थेसह दादागिरी आणि दहशत निर्माण करणार्‍या टोळ्यांविरूद्ध पुणे पोलिसांनी शड्डू ठोकला आहे. त्यामुळे अवघ्या काही दिवसांतच कुख्यात नीलेश घायवळ याच्यासह टोळीविरूद्ध तब्बल १० गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर गृहकलहातून नातवाचा खून करणार्‍या बंडू आंदेकर टोळीविरूद्धही आतापर्यंत पोलिसांनी १३ गुन्हे दाखल केले आहेत. त्यामुळे आरोपींना एका गुन्ह्यात जरी जामीन झाला, तरी मात्र, दुसर्‍या गुन्ह्यात वर्ग करून घेताना पोलिसांना त्रास होणार नाही. दरम्यान, पुण्यातील नामचिन गुंडांच्या टोळ्यांविरूद्ध थेट मोक्कानुसार कारवाईसह गुन्ह्यांची मालिका रजिस्ट्रर केली आहे. त्यामुळे आगामी निवडणूकांमध्ये गुंडांचा हस्तक्षेप टळण्यास मदत होणार आहे.

ओला दुष्काळ असलेल्या भागातील शेतकऱ्यांना बळ दे- आमदार हेमंत रासने – सविस्तर बातमी

पुण्यातील कोथरूड परिसरात किरकोळ कारणावरून कुख्यात गुंड नीलेश घायवळ याच्या गँगने तरूणावर गोळीबार करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न १७ सप्टेंबरला केला होता. याप्रकरणी पुणे पोलिसांसह स्थानिक नेत्यांच्या कार्यक्षमतेवर नागरिकांनी सोशल मीडियावर जोरदार टीका केली. त्यानंतर मात्र, पोलिसांनी खाक्या दाखवित घायवळला इंगा दाखवायला सुरूवात केली. गोळीबार प्रकरणातील टोळक्याला अटक करून त्यांची धिंड काढली. त्यानंतर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या सूचनेनुसार घायवळ टोळीविरूद्ध थेट मोक्कानुसार कारवाईचा बडगा उगारण्यात आला. अटकेच्या भीतीपोटी कुख्यात घायवळ अंडरग्राउंड झाला. त्यानंतर अटकेच्या भीतीपोटी घायवळने परदेशात पलायन केले. दरम्यान, पोलिसांनी त्याच्या घराची झडती घेत रोकड, कुलमुखत्यारपत्र, बँकेचे पासबुक, खरेदीखत जप्त केले होते. तेथूनच घायवळच्या अस्ताला सुरूवात झाली

घायवळविरूद्ध महिन्यांत १० गुन्हे

घायवळने बनावट कागदपत्राद्वारे मूळगावी अहिल्यानगरमधून पासपोर्टसाठी अर्ज केला. त्यामध्ये त्याने घायवळऐवजी गायवळ असा इंग्रजीतील शब्दात खेळी करून पोलिसांची दिशाभूल केली. पोलिसांच्या तांत्रिक पडताळणीत गायवळविरूद्ध एकही गुन्हा नसल्याचा अहवाल पासपोर्ट कार्यालयात देण्यात आला. त्यानुसार घायवळने पासपोर्ट मिळवून ९० दिवसांचा स्वित्झलॅडचा व्हिजाही पदरात पाडून अलगद परदेशात पलायन केले. आपण बाहेर गेल्यानंतर इथली परिस्थिती सुधारेल, असा भाबडा विश्वास त्याने बाळगला असावा. मात्र, त्याच्याविरूद्ध कोथरूड पोलिसांनी गुन्ह्यांची मालिकाच सुरू केली. नागरिकांमध्ये दहशत माजविणे, जमीन बळकावणे, खंडणी उकळणे, जमिनीवर ताबा मिळविणे, फ्लॅट बळकाविणे, वाहनाला बनावट क्रमांक वापरणे अशा विविध प्रकरणात कुख्यात नीलेश घायवळविरूद्ध पुणे पोलिसांनी आतापर्यंत १० गुन्हे दाखल करीत त्याला घायाळ केले आहे.

आंदेकराच्या घरातील वादनेच टोळीचा अस्त, १३ गुन्हे

पुण्यातील कुख्यात गुंड बंडू आंदेकर याच्याही टोळीची मागील ३० वर्षांपासून दहशत होती. मात्र, स्वतःच वाढवलेल्या गुन्हेगारांना एकसंध ठेवण्यात आलेल्या अपयशामुळे टोळीच्या अस्ताला सुरूवात झाली. त्यामुळे आंदेकराच्या जावयानेच थेट मेव्हण्याच्या खुनाचा कट रचला. टोळीतील सोम्या गायकवाडला फोडून आरोपी गणेश कोमकरने मेव्हणा वनराज आंदेकर याच्यावर गोळ्या झाडून त्याची ५ सप्टेंबर २०२४ रोजी नाना पेठेत हत्या केली. त्यानंतर मात्र, सुडापोटी पेटलेल्या बंडूने पोराच्या वर्षश्राद्धापुर्वीच बदला घेण्याची शपथ घेतली. आंदेकर टोळीने गायकवाड कुटूंबियाला ठोकण्याचे प्लॅनिंगही केले. मात्र, भारती विद्यापीठ पोलिसांसह गुन्हे शाखेने टोळीचा डाव उधळून लावला.

सुडापोटी पेटलेल्या कुख्यात बंडू आंदेकरने सख्ख्या नातवाचा खून घडवून आणण्याचा डाव रचून तो यशस्वीही केला आहे. याप्रकरणात आता संपुर्ण आंदेकर टोळीविरूद्ध मोक्कानुसार कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याविरूद्ध विविध स्वरूपाचे तब्बल १३ गुन्हे दाखल केले आहेत. त्यामध्ये खंडणी उकळणे, बेकायदा ताबा घेणे, वसुली करणे, खुनाच्या गुन्ह्याचा समावेश आहे. पुण्यातील कुख्यात आंदेकर टोळीविरूद्ध आतापर्यंत अतिशय कमी कालावधीत एवढ्या मोठ्या प्रमाणावर गुन्हे दाखल होण्याची पहिलीच वेळ आहे. पोलीस एवढ्यावरच थांबले नसून, त्याचे बेकायदा घर पाडून टाकण्यात आले. बँकखाती गोठवून व्यवहार ठप्प केले आहेत. पोलिस आयुक्त अमितेश कुमार , सह पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलिस आयुक्त गुन्हे, पंकज देशमुख, पोलिस उपायुक्त गुन्हे निखिल पिंगळे, एसीपी शंकर खटके, एसीपी राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली समर्थ ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक उमेश गित्ते यांनी केली.

आगामी निवडणूकांमध्ये होणार फायदा

पुण्यातील महत्वाच्या दोन टोळ्यापैकी घायवळ आणि आंदेकर टोळीची नागरिकांमध्ये दहशत होती. जमीन बळकावणे, ताबा मारणे, खून, खूनाचा प्रयत्न, खंडणीसह विविध गंभीर गुन्ह्यांमुळे टोळीचा दबदबा होता. मात्र, घायवळच्या टोळीने एक चुक करीत तरूणावर गोळीबार केला. त्यामुळे टोळीविरूद्ध गुन्हे दाखल करीत त्यांचे कंबरडे पोलिसांनी मोडले आहे. तर गृहकलहातून आंदेकर टोळीने स्वतःच्या टोळीचा अस्त करून घेतला आहे. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या खमक्या आणि नेमक्या भूमिकेमुळे दोन्ही सराईत टोळ्यांना मोठा दणका बसला आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये फायदा होणार आहे. गुन्हेगारांचा हस्तक्षेप होणार नसून, नागरिकांना भयमुक्त मतदान करता येणार आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×