वसंतराव मसके यांचा सन्मानपत्र देऊन अमृतमहोत्सवी सत्कार
marathinews24.com
पुणे – समाज आणि प्रशासनात दांभिकपणा वाढत असून प्रामाणिकपणा, खरेपणा दुर्मिळ होत चालला आहे. नवीन पिढीला दिशा दाखवायची असेल तर प्रत्येकाला स्वत:च्या कृतीतून आदर्श घडवावा लागेल. शासकीय सेवेत कार्यरत असताना वसंतराव मसके यांनी आपल्या कार्यातून वेगळी छाप उमटविली. त्यांच्या कार्याची आजही आठवण काढली जाते. मसके यांच्या समाजाभिमुख कार्यामुळे त्यांचा लोकसंग्रह अफाट असून हीच त्यांची श्रीमंती आहे, असे गौरवोद्गार पुण्याचे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांनी काढले.
अष्टविनायकातील मोरगाव, थेऊर, सिद्धटेक मंदिरे १० मे ते ९ जूनपर्यंत बंद – सविस्तर बातमी
इंदिरा युनिव्हर्सिटी, इंदिरा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटस व संवाद पुणे यांच्यावतीने माजी प्रशासकीय अधिकारी व इंदिरा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटस्चे विश्वस्त वसंतराव मसके यांच्या अमृतमहोत्सव सत्कार आणि सन्मानपत्र प्रदान समारंभ पार पडला. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या हस्ते मसके यांचा मानपत्र, पुणेरी पगडी, शाल, रोपटे देऊन सन्मान केला. यावेळी अध्यक्षस्थानी इंदिरा युनिव्हर्सिटी, इंदिरा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या अध्यक्ष डॉ. तरिता शंकर होत्या.
मसके यांच्या कन्या संयुक्ता मसके, सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष, प्रा. एम. एन. नवले, विखे पाटील मेमोरियल सोसायटीचे अध्यक्ष डॉ. अशोक विखे पाटील, आंतरराष्ट्रीय स्काय डायव्हर पद्मश्री शीतल महाजन, श्री चाणक्य एज्युकेशन सोसायटीचे खजिनदार पिलाजी (बाबासाहेब) जाधवराव, इंदिरा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे सीएमओ व शैक्षणिक सल्लागार प्रा. चेतन वाकलकर, आर्थिक विकास मंडळाचे उपाध्यक्ष सचिन ईटकर, संवाद पुणेचे सुनील महाजन मंचावर होते. ध्रुव ऑडिटोरियम, इंदिरा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट, वाकड येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
समाजातील विदारक घटनांवर भाष्य करत चंद्रकांत पुलकुंडवार म्हणाले, सेवा बजावत असताना त्याचा दिखावा करणे टाळले पाहिजे. माझ्यामुळे सामान्य माणसाच्या आयुष्यात काही सकारात्मक बदल झाला आहे का याचे उत्तर प्रत्येकाने शोधले पाहिजे. नोंदणी आणि मुद्रांक विभागात डिजिटायझेशनचे काम सुरू असताना वसंतराव मसके यांनी आपल्या कार्यातून वेगळा ठसा उमटविला.
सत्काराला उत्तर देताना मसके यांनी शासकीय सेवा तसेच वैयक्तिक आयुष्यात सुहृदांनी केलेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले. मसके यांच्या कृतिशील कार्याचा गौरव करून अशोक विखेपाटील म्हणाले, सरकारी काम करायचे म्हटले की त्यात अनेक फाटे फोडले जातात. नोंदणी आणि मुद्रांकन विभागातील मसके यांच्या कामामुळे अनेकांना फायदा झाला आहे. दरम्यान, एम. एन. नवले यांनी सांगितले की, मसके सिंहगड इन्स्टिट्यूटचे विश्वस्त होते. आता इंदिरा इन्स्टिट्यूटचे विश्वस्त आहेत. त्यांचा अनुभव, ओळखी, लोकसंग्रह प्रचंड आहे. ज्याचा या संस्थांना फार फायदा झाला. त्यांना कितीही अवघड काम सांगितले तरी ते तडीस गेलेच याची खात्री असते.
श्री चाणक्य एज्युकेशन सोसायटीचे खजिनदार पिलाजी (बाबासाहेब) जाधवराव म्हणाले माणसे निवृत्तीनंतर आरामदायी आयुष्य जगतात, पण मसके निवृत्तीनंतर खऱ्या अर्थाने उदयास आले आहेत. त्यांचा लोकसंग्रह मोठा आहे. अनेकांच्या आयुष्यातील अडचणी सोडविण्यात ते नेहमी पुढे असतात. तर सचिन ईटकर म्हणाले, महसूल खात्यात वसंतराव होते. ते फार डायनॅमिक असल्याचे ऐकले होते. त्यांच्याविषयी कुतूहल होते. समोरच्या माणसाला जिंकून घेणे हे त्यांच्या व्यक्तिमत्वातील वैशिष्ट्य होय. त्यांनी प्रशासनाची व्याख्या बदलली. त्यांनी प्रशासन म्हणजे बांधिलकी, सुसूत्रता, सहवेदना, प्रशासन लोकांसाठी आहे अशी ओळख निर्माण केली. त्यांच्या आयुष्याची कमाई म्हणजे त्यांनी जोडलेली चांगली माणसे होत.
तरिता शंकर म्हणाल्या, सकारात्मक आणि स्पष्टवक्तेपणा हा मसके यांचा खूप महत्त्वाचा गुण आहे. त्यांच्याकडे येणारा कधीच रिकाम्या हाताने जात नाही. ते कधीही, कोणत्याही अडचणी सोडविण्यासाठी कायम तत्पर असतात. डॉ. अंजली काळकर, डॉ. आशुतोष मिसळ यांनी सूत्रसंचालन केले. या वेळी तरिता शंकर यांचा संवाद पुणेच्या वतीने सुनील महाजन, निकिता मोघे यांनी विशेष सत्कार केला. प्रशांत पवार, सुनील चव्हाण, रवींद्र डोमाळे उपस्थित होते.























