काळेपडळ पोलिसांकडून ६ जण गजाआड
marathinews24.com
पुणे – प्रेमसंबंध तोडण्यासाठी तरुणीच्या आईच्या प्रियकराने टाकलेला दबाब आणि धमकीमुळे त्याचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना हडपसरमधील काळेपडळ परिसरात घडली. याप्रकरणी काळेपडळ पोलिसांनी तपास करुन तरुणीच्या प्रियकरासह साथीदारांना अटक केली. या प्रकरणात अटकेत असलेला प्रियकर हा सराइत आहे.
गॅसबील अपडेटच्या बहाण्याने घातला गंडा – सविस्तर बातमी
दुर्वांग उर्फ पारस सुनील मानकर (वय २१, रा. हिराबाग, शुक्रवार पेठ, टिळक रस्ता) , पारस किशोर गायकवाड (वय २१, रा. दत्तवाडी, सिंहगड रस्ता), अभिजित उर्फ अभि संजय इंगळे (वय २२), सोमनाथ रमेश दोरकर (वय २१), साहिल सागर शेलार (वय २४, सर्व रा. हडपसर), चंद्रशेखर सोमनाथ जावीर (वय २०, रा.सुखसागरनगर, कात्रज) यांना अटक केली. गणेश संजू बिरादार (वय २५, रा. ससाणेनगर, हडपसर) असे खून झालेल्याचे नाव आहे.
खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार दुर्गांग मानकर हा सराइत आहे. त्याच्याविरुद्ध गंभीर स्वरुपाचे पाच गुन्हे दाखल आहेत. दुर्वांग याचे एका तरुणीचे प्रेमसंबंध होते. गणेश याचे दुर्वांगच्या प्रेयसीच्या आईसोबत प्रेमसंबंध होते. गणेश विवाहित होता. दुर्वांगची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याने गणेशने तरुणीला त्याच्यासोबत असलेले प्रेमसंबंध तोडण्यास सांगितले होते. त्याने तिच्यावर दबाब आणला होता. त्याने तरुणीच्या आईला याबाबतची माहिती दिली होती. या कारणावरुन दुर्वांग आणि गणेश यांच्यात वाद झाले होते. ३ मे रोजी हडपसरमधील ससाणेनगर भागात असलेल्या इमारतीच्या परिसरात रात्री साडेदहाच्या सुमारास गणेश थांबला होता. त्या वेळी आरोपी दुर्वांग आणि साथीदार तेथे आले. त्यांनी गणेश याला शिवीगाळ करुन मारहाण करण्यास सुरुवात केली. गणेश याच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू घालून आरोपी पसार झाले. गंभीर जखमी झालेल्या गणेशला रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपाचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी काळेपडळ पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला. पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तीन पथके तयार केली.
पसार झालेल्या आरोपींना सापळा लावून वेगवेगळ्या भागातून अटक करण्यात आली. आरोपींना न्यायालयाने पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. पोलीस उपायुक्त डाॅ. सागर कवडे, सहायक आयुक्त अतुलकुमार नवगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब बाबर, सहायक निरीक्षक अमित शेटे, अजय हंचाटे, हवालदार प्रवीण काळभोर, नीलेश देसाई, प्रतीक लाहिगुडे, दाऊद सय्यद, परशुराम पिसे, राजू वाघमारे, शाहिद शेख, बालू ठाकूर, राकेश साळुंके, अतुल पंधरकर यांनी ही कारवाई केली.























