दोन बांग्लादेशी महिलांना अटक, अल्पवयीन ताब्यात
marathinews24.com
पुणे – विमानतळावरून गुवाहाटी (आसाम) येथे पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या दोन बांगलादेशी महिलांसह अल्पवयीन मुलाला खडक पोलिसांनी विमानतळ पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी शाहीनूर बेगम शेख (वय ४२), शागुरिका बेगम युलिया शेख (वय २८) यांना अटक केली असून, अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त कृषीकेश रावले यांनी दिली आहे.
रिक्षा चालकावर कोयत्याने हल्ला; जुन्या वादातून मारहाण – सविस्तर बातमी
बेकायदा वास्तव्य करणार्या बांग्लादेशी नागरिकांविरूद्ध पुणे पोलिसांनी कारवाईची मोहिम हाती घेतली आहे. त्यानुसार विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत बांग्लादेशी नागरिकांची सर्च मोहिम राबवली जात आहे. प्रामुख्याने मध्यवर्ती फरासखाना, विश्रामबाग, खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारवाईला गती देण्यात आली आहे. दरम्यान, पुणे विमानतळावरून गुवाहटीला पळून जाण्याच्या तयारीतील बांग्लादेशींची माहिती उपायुक्त कृषीकेश रावले यांना मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक महेंद्र कांबळे यांचे पथक विमानतळाकडे पाठवण्यात आले.
विमानतळ ठाण्याचे अधिकारी पालवे, सीआयएसएफचे अधिकारी संतोषकुमार अग्निहोत्री यांच्या पथकाच्या मदतीन् सापळा रचून तिघा बांग्लादेशींना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यांनी बांगलादेशातील बिगाराट जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे सांगितले. ते सोलापूरहून पुण्यात आले असून पुण्याहून गुवाहाटीला जाणार असल्याची कबुली दिली. पुढील कारवाईसाठी तिघांना विमाननगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कामगिरी पोलिस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलिस आयुक्त राजेश बनसोडे, उपायुक्त कृषिकेश रावले आणि एसीपी अनुजा देशमाने, शशिकांत चव्हाण, किरण ठवरे, नीलेश दीवटे, शुभम केदारी, विश्वजित गोरे, विकास पाडोळे, माने यांनी केली.
१० महिन्यांत ९७ बांग्लादेशी ताब्यात
परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त कृषीकेश रावले यांनी मागील १० महिन्यात विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून ९७ बांगलादेशींना ताब्यात घेतले आहे. संबंधितांना त्यांच्या देशात पाठवून देण्यासाठी प्राधान्य दिले असून, ही कारवाई वेगाने सुरू असल्याचे रावले यांनी सांगितले आहे.























