कुटुंब बाहेरगावी असताना चोरट्यांनी साधला डाव
marathinews24.com
पुणे – भरदिवसा घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटातील एक लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लांबविल्याची घटना हडपसरमधील बिराजदारनगर भागात घडली. याबाबत एका तरुणाने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सातबारा उताऱ्यावर नाव लावून देण्याच्या आमिषाने २६ लाखांची फसवणूक – सविस्तर बातमी
पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुण कुटुंबीयांसह हडपसरमधील बिराजदारनगर परिसरात राहायला आहे. २७ जुलै रोजी सकाळी अकराच्या सुमारास तक्रारदार तरुणाचे कुटुंबीय कामानिमित्त बाहेर पडले. चोरट्याने घराचे कुलूप तोडून कपाटातील एक लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लांबविले. दुपारी एकच्या सुमारास कुटुंबीय घरी परतले. तेव्हा घराच्या दरवाज्याचे कुलूप तुटल्याचे निदर्शनास आले. चोरट्याने कपाटातील दागिने चोरल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांकडे तक्रार देण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक शशिकांत लोंंढे तपास करत आहेत.
सोसायटीच्या कार्यालयात चोरी
कर्वेनगर भागातील एका सोसायटीच्या कार्यालयाचे कुलूप तोडून चोरट्यांनी सीसीटीव्ही चित्रीकरण साठविणारे डीव्हीआर यंत्र चोरुन नेल्याची घटना उघडकीस आली. याबाबत एकाने अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहेे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्वेनगर भागात आनंद निकेतन सोसायटी आहे. २८ जुलै रोजी मध्यरात्री सोसायटीच्या आवारातील कार्यालयाचे कुलूप तोडून चोरट्यांनी सीसीटीव्ही चित्रीकरण साठविणारे डीव्हीआर यंत्र, दोन जुन्या बॅटऱ्या चोरुन नेल्या. चोरलेल्या डीव्हीआर यंत्राची किंमत १३ हजार रुपये असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक साठे तपास करत आहेत.
























