फुलांनी सजविलेल्या मयूर रथातून दगडूशेठ गणपती बाप्पांचे दिमाखदार आगमन; वृंदावनच्या प्रेम मंदिराच्या प्रतिकृतीत श्रींची प्राणप्रतिष्ठा
marathinews24.com
पुणे – गणपती बाप्पा मोरया… मंगलमूर्ती मोरया… च्या जयघोषात श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरापासून फुलांनी सजविलेल्या मयूर रथातून निघालेल्या दिमाखदार आगमन मिरवणुकीने वाजत गाजत वृंदावन मधील प्रेम मंदिराच्या जय गणेश प्रांगण येथे साकारलेल्या प्रतिकृतीमध्ये ‘दगडूशेठ’ चे गणपती बाप्पा विराजमान झाले. श्रीं चा हा नयनरम्य आगमन सोहळा पाहण्याकरता हजारो भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने ट्रस्टच्या १३४ व्या वर्षानिमित्त आयोजित उत्सवाचा प्रारंभ हजारो भक्तांच्या साक्षीने झाला. गणेश चतुर्थीला सकाळी ११ वाजून ११ मिनिटांनी उत्सवाची पारंपरिक जागा असलेल्या जय गणेश प्रांगण येथे उत्तरप्रदेश वृंदावन येथील श्री राधावल्लभ मंदिराचे १८ वे तिलकायत अधिकारी श्रीहित मोहितमराल गोस्वामीजी महाराज यांच्या हस्ते श्रीं ची प्राणप्रतिष्ठापना झाली. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, उपाध्यक्ष डॉ. रामचंद्र उर्फ बाळासाहेब परांजपे, उपाध्यक्ष माणिक चव्हाण, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस व आमदार हेमंत रासने, सहचिटणीस अमोल केदारी, उत्सव प्रमुख अक्षय गोडसे, विश्वस्त रोहित लोंढे, पराग वांबुरे, राजेंद्र गावडे, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण यांसह सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
सकाळी साडे आठ वाजता मुख्य मंदिरापासून फुलांनी सजविलेल्या मयूर रथातून श्रीं ची आगमन मिरवणूक काढण्यात आली. यावेळी गंधाक्ष ढोल ताशा पथक, मयूर बँड, प्रभात बँड आणि दरबार बँड मिरवणुकीत सहभागी झाले होते. मुख्य मंदिर, अप्पा बळवंत चौक, शनिपार चौक, टिळक पुतळा मंडईमार्गे उत्सव मंडपात मिरवणूक आली.
ॠषिपंचमीनिमित्त ३५ हजार महिलांचे अर्थवशीर्ष पठण
मंगळवार, दिनांक १५ सप्टेंबरला पहाटे ६ वाजता ॠषिपंचमीनिमित्त दरवर्षीप्रमाणे ३५ हजार महिला सामुदायिकरीत्या अर्थवशीर्ष पठण करणार आहेत. यावेळी पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे, विभागीय आयुक्त शीतल तेली – उगले उपस्थित राहणार आहेत. तसेच रात्री १० ते १२ वाजेपर्यंत हरी जागरच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वारकरी बंधू वारकरी गजर करीत गणरायाचरणी सेवा अर्पण करणार आहेत.





















