भारती विद्यापीठ पोलिसांत गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – पेन्शन कार्ड देण्याच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी एका ज्येष्ठ नागरिकाची २३ लाख ७८ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध भारती विद्यापीठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या ताफ्यात दुचाकी घालण्याचा प्रयत्न – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ७२ वर्षीय ज्येष्ठ नागरिक हे कात्रजमधील लेक टाऊन सोसायटीत राहायला आहेत. सायबर चाेरट्यांनी त्यांच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. एका राष्ट्रीयकृत बँकेकडून ज्येष्ठ नागरिकांना पेन्शन कार्ड देण्यात येणार आहे. त्यानंतर सायबर चोरट्यांनी त्यांच्याकडे बतावणी करुन वेळोवेळी ऑनलाइन पद्धतीने पैसे घेतले. गेल्या तीन ते चार दिवसांत ज्येष्ठ नागरिकाने चोरट्यांच्या खात्यात तब्बल २३ लाख ७८ हजार रुपयांची रक्कम जमा केली. रक्कम जमा केल्यानंतर चोरट्यांनी पुन्हा त्यांच्याशी संपर्क साधला. आणखी रक्कम भरावी लागेल, असे सांगितले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यानी नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. गु्न्हे शाखेचे निरीक्षक जाधव तपास करत आहेत.
ऑनलाइन टास्कच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूक
घरातून ऑनलाइन पद्धतीने कामाची संधी असे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी सिंहगड रस्ता परिसरातील एका तरुणाची चार लाख ११ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत एका तरुणाने नऱ्हे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, तक्रारदार तरुणाच्या मोबाइल क्रमांकावर सायबर चोरट्यांनी संदेश पाठविला. घरातून ऑनलाइन कामाची संधी असे आमिष त्यांना दाखविले. ऑनलाइन पद्धतीने काम केल्यास चांगला परतावा मिळेल, असे तरुणाला सांगण्यात आले. तरुणाला सुरुवातीला एक काम देण्यात आले. हे काम पूर्ण केल्यानंतर त्याला परताव्यापोटी रक्कम देण्यात आली. तरुणाचा विश्वास बसल्याने चोरट्यांनी तरुणाला रक्कम गुंतविण्यास सांगितले. रक्कम गुंतविल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखविण्यात आले. चोरट्यांच्या खात्यात तरुणाने चार लाख ११ हजार रुपये जमा केले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणाने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक वर्षा देशमुख तपास करत आहेत.




















