न्यायालयाच्या सुरक्षा व्यवस्थेचे ऑडिट करण्याच्या हालचाली
marathinews24.com
पुणे – Pune District Court Security : शहरातील जिल्हा न्यायालयाच्या परिसरात घडलेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर पोलीस आणि जिल्हा न्यायालय प्रशासन खडबडून जागे झाले आहे. घटनेची गंभीर दखल घेत प्रमुख जिल्हा न्यायाधीशांनी पोलीस आयुक्तांना बोलावून घेत न्यायालय परिसरात सुरक्षाव्यवस्था सक्षम करण्याचे आदेश दिले. त्यापार्श्वभूमीवर न्यायालयाच्या सुरक्षा व्यवस्थेचे ऑडिट करण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून, न्यायालयातील सुरक्षेसाठी स्वतंत्र प्रमाणित कार्यपद्धती (एसओपी) तयार करण्यात येणार आहे.
जिल्हा न्यायालयाच्या परिसरात कारागृहात असलेल्या आरोपीला गांजा पुरविल्याचे प्रकरणानंतर न्यायालयातील सुरक्षा व्यवस्थेचे ऑडिट करण्याची घोषणा पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी ऑगस्टमध्ये केली होती. त्यानंतर बुधवारी (दि. २५ ) न्यायालयाबाहेर तरुणावर झालेल्या हल्ल्याच्या घटनेनंतर तीन महिन्यांनी आता न्यायालयाच्या सुरक्षेचे ऑडिट करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. पोलिस आयुक्तांनी प्रमुख जिल्हा न्यायाधीश ए. एस. शेंडे यांची भेट घेतली. यावेळी सह पोलिस आयुक्त संजय दराडे, अतिरिक्त पोलिस आयुक्त राजेश बनसोडे, संजय पाटील, गुन्हे शाखेचे उपायुक्त गौहर हसन, वाहतूक शाखेचे उपायुक्त संजीव भाजीभाकरे, विशेष शाखेचे उपायुक्त प्रशांत अमृतकर उपस्थित होते.
सीसीटीव्ही, तपासासाठी उभारणार यंत्रणा
पोलिसांची, न्यायाधिशांची वाहने, पक्षकार आणि वकीलांसाठी कोणते प्रवेशद्वार वापरायचे, वाहने कुठे उभी करायची, याबाबत चर्चा झाली. तसेच, न्यायालयाच्या सुरक्षा व्यवस्थेसाठी तयार करण्यात येणार्या एसओपीमध्ये प्रवेशद्वारावरील तपासणी, वाहनांचे प्रवेशमार्ग, पार्किंग व्यवस्था आणि सीसीटीव्ही यंत्रणेबाबत स्पष्ट निर्देश देण्यात आले. पोलिस अधिकार्यांनी न्यायालयाच्या परिसराची पाहणी केली. न्यायालय परिसरात ३२ सीसीटीव्ही कॅमेरे असून, त्यापैकी किती कॅमेरे सुरू आहेत, त्यांची सद्यःस्थिती काय आहे, तसेच आणखी किती ठिकाणी कॅमेरे बसविण्याची आवश्यकता आहे, याची माहिती घेण्यात आली. दरम्यान, न्यायालयाच्या प्रवेशद्वाराजवळ होणारी वाहनांची गर्दी आणि अनियंत्रित पार्किंग टाळण्यासाठी पार्किंग व्यवस्था अधिक सक्षम करणार आहे. न्यायालय परिसरात प्रवेश करणार्या वाहनांची तपासणी अधिक कडक करण्यावर भर दिला जाणार आहे. संशयास्पद वाहने तसेच विनापरवाना प्रवेश करणार्या व्यक्तींवर विशेष लक्ष असणार आहे. प्रवेशद्वारांवर पोलिसांची संख्या वाढविण्यासह आवश्यक ठिकाणी बॅरिकेडिंग करणार आहे. सीसीटीव्हीच्या माध्यमातून वाहनांच्या हालचालींवरही लक्ष ठेवले जाणार आहे.
न्यायालयाच्या परिसरात सध्या ३२ सीसीटीव्ही कार्यरत असून त्यापैकी काही सीसीटीव्ही बंद आहेत. ते सुरू करण्याबाबत तसेच आणखी सीसीटीव्ही वाढवण्यासंदर्भात चर्चा झाली. न्यायालय परिसरात पार्किंग व्यवस्था अधिक सक्षम करणे, न्यायालयात येणार्या वाहनांची तसेच व्यक्तींची तपासणीबाबत चर्चा झाली आहे.
अमितेश कुमार, पुणे पोलिस आयुक्त






















