आरोपीच्या घरी मिटींग, आधी गोळीबार मग वार; पुण्यात न्यायालयाबाहेर आरोपी हल्ला प्रकरण
marathinews24.com
पुणे – Pune Court Attack Case : भावाच्या खूनाचा बदला घेण्यासाठी संबंधित कुटूंबियाच्या नातलगांनी ५० हजारांची सुपारी दिली होती. त्यानंतर मध्यप्रदेशातून पिस्तूलाची खरेदी केल्यानंतर आरोपीच्या घरी खुनाचे प्लॅनिंग करण्यात आले. अगोदर पिस्तूलातून गोळ्या झाडायच्या, आरोपी गंभीर जखमी झाल्यानंतर कोयत्याने वार करुन ठार मारण्याचेही ठरले होते. मात्र, हल्ल्यावेळी पिस्तूलातून सुटलेली गोळी चुकली. त्यानंतर टोळक्याने त्याच्यावर सपासप वार करुन खूनाचा प्रयत्न केला. परंतु, वेळेत उपचार मिळाल्यामुळे संबंधित आरोपी गंभीररित्या जखमी झाला असून, त्याला ससून रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी पोलिसांनी ८ जणांना अटक केली असून, एका अल्पवयीनाला ताब्यात घेतले आहे.
पोलीस असल्याची बतावणी, जेष्ठाला ११ लाखांचा गंडा – सविस्तर बातमी
मंदार मारुती किवळे (वय ३५ रा. नवीन वसाहत, कात्रज) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी अक्षय सुभाष चव्हाण (वय २० रा संतोषनगर, कात्रज) अमोल रामचंद्र चव्हाण (वय ४८ रा. मालती अपार्टमेंट, कात्रज) स्वप्नील बाजीराव गवळी (वय २८, रा. संतोषनगर, कात्रज) ओंकार उर्फ बब्या संतोष पवार (वय १८, रा. आंबेगाव पठार) सुरज साधू मळेकर (वय २२ रा. मोहननगर, धनकवडी) सत्यम सदाशिव मोरे (वय २५, रा. कात्रजगाव) प्रथमेश दीपक येणपुरे वय १९ रा. कात्रज, मूळ-पाबे, वेल्हा) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तर अर्थव सोपान मारणे (वय १९ रा. राजविलास कॉम्पलेक्स, भारती विद्यापीठ) हा सध्या येरवडा कारागृहात असून, त्याच्यासह अल्पवयीनाला ताब्यात घेतले आहे.
भावाच्या खूनाचा बदल्याची आग, सुपारी अन प्लॅनिंग
Pune Court Attack Case घरालगत असलेल्या अर्धा गुंठा च्या वादातून सराईतासह आरोपींनी शुभम सुभाष चव्हाण याचा २० एप्रिल २०२५ रोजी कात्रज संतोषनगरात खून केला होता. त्यामध्ये आरोपी मंदार किवळे सहभागी होता. त्यामुळे सूडाच्या भावनेने पेटलेल्या अक्षय चव्हाण याने मंदारचा खून करण्याचे ठरवले. त्यासाठी त्याने प्लॅनिंग करण्यास सुरुवात केली होती. साथीदारांची जमवाजमव करणे, त्यांना आमिष दाखवले, सूडापोटी पेटवले होते. काही दिवसांपुर्वी त्याने एकाला मध्यप्रदेशात पाठवून पिस्तूलची खरेदी केली होती. दरम्यान, १८ नोव्हेंबरला खूनातील आरोपी मंदार हा जामिनावर कारागृहाबाहेर आला. त्या दिवसापासून आरोपी अक्षयने हालचाली वाढवल्या. त्याच्या घरात आरोपींनी मिटींग घेतली. कोणी काय करायचे याचे नियोजन केले. त्यानंतर दुसर्या दिवशी २५ नोव्हेंबरला दुपारी पावणेएकच्या सुमारास मंदारवर कोयत्याने हल्ला करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
आधी गोळ्या झाडायच्या, मग वार करुन तोडायचे
आरोपी मंदारवर आधी गोळ्या झाडून जखमी करायचे, त्यानंतर त्याच्यावर कोयत्याने वार करून ठार मारण्याचे आरोपींच्या बैठकीत ठरले होते. मात्र, हल्ल्याच्या दिवशी आरोपीने पिस्तूलातून मारलेली गोळी चुकल्यानंतर दुसर्या आरोपीने मंदारला गाठले. त्याच्यावर कोयत्याचा वर्मी घाव घालून खाली पाडले. त्यानंतर दोघा हल्लेखोरांनी सपासप वार करुन त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला. १० ते १२ वार केल्यानंतर दोन दुचाकीवरुन आरोपींनी पलायन केले.
भरदिवसा वर्दळीच्या ठिकाणी मारायचे, दहशत करायची
भावाच्या खुनामुळे इरेला पेटलेल्या आरोपी अक्षय चव्हाण याने आरोपी मंदारचा गेम वाजवायचा ठरवले होते. त्याला भर चौकात मारायचे, आपली दहशत निर्माण करायची, कोयत्याने वर्मी घाव घालण्याचे ठरवले होते. विशेष म्हणजे हा हल्ला भरदिवसा आणि वर्दळीच्या ठिकाणीच करायचा, त्यामुळे चर्चा होऊन टोळीची दहशत इतरांमध्ये निर्माण होईल, असा कयास हल्लेखोरांनी बांधला होता.
न्यायालयाबाहेरील एकावर झालेल्या हल्ल्याची घटना गंभीर असून, जखमीला पोलिसांनी त्वरित रुग्णालयात दाखल केले. आरोपींना तत्काळ अटक केली आहे. आरोपीने भावाच्या खूनाच्या बदल्यातून साथीदारांच्या मदतीने हल्ला केला आहे. याप्रकरणी मोक्कानुसार कारवाई करण्यात येणार आहे. प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभागी असलेल्याविरुद्ध कारवाई केली जाणार आहे.
अमितेश कुमार, पोलीस आयुक्त, पुणे शहर





















