रिकाम्या सिलेंडरमध्ये भरला जात होता गॅस
marathinews24.com
पुणे – Illegal Gas Refilling : शहरातील मुंढवा परिसरात अवैध गॅस रिफिलिंगचा धंदा सुरू असल्याचे उघडकीस आले आहे. आरोपी पाईपच्या साहाय्याने भरलेल्या सिलेंडरमधून थोड्या प्रमाणात गॅस काढून तो रिकाम्या सिलेंडरमध्ये भरत होते. त्यानंतर हा गॅस परवानगीशिवाय विकला जात होता. या रिफिलिंगमुळे गॅस गळती आणि आग लागण्याचा धोका होता. याप्रकरणी ३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. भूपेंद्र प्रताप सुंदर सिंग (वय ३८ रा. साई नगर, मुंढवा) मनकरम सुखराम सियाक (वय ३९ रा. सोमनाथ माळ चंदननगर) महेंद्र बाबूराम खिचड (वय १९ रा. साईनाथ नगर, खराडी) अशी आरोपींची नावे आहेत.
पीएमपीएल बस प्रवासात जेष्ठेची सोन्याची बांगडी चोरीला – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आर्थिक फायद्यासाठी गॅस सिलिंडर अवैधपणे भरण्याची व्यवस्था केली होती. संबंधित विभागाची परवानगी न घेता, फिलिंग पाईपच्या साहाय्याने भरलेल्या सिलिंडरमधून गॅस काढून तो रिकाम्या सिलिंडरमध्ये भरला जात होता. ७ ऑक्टोबरला सकाळी साडेनउच्या सुमारास पोलिसांना हा प्रकार उघडकीस आला. आरोपी परवानगीशिवाय गॅस काढून तो इतर सिलिंडरमध्ये भरत होते. (Illegal Gas Refilling) या प्रक्रियेत सुरक्षा नियमांचे पालन केले जात नव्हते. गॅस गळतीमुळे आग लागण्याचा किंवा स्फोट होण्याचा धोका होता, ज्यामुळे जवळच्या रहिवाशांच्या सुरक्षेला संभाव्य धोका निर्माण झाला होता.
पोलीस अधिकारी एकता बाबूराव साळुंके यांच्या तक्रारीच्या आधारे, मुंढवा पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम १२५, २८७ आणि अत्यावश्यक वस्तू कायदा, १९५५ च्या कलम ३ आणि ७ अंतर्गत तिन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. उपनिरीक्षक स्मिता वासनिक या प्रकरणाचा तपास करत आहेत. दरम्यान, पोलीस उपायुक्त जीवन बेनिवाल यांनी सांगितले की, अशा बेकायदेशीर कृत्यांना प्रतिबंध घालण्यासाठी इतर भागांवरही लक्ष ठेवले जात आहे. बेकायदेशीरपणे सिलेंडर भरताना दिसल्यास नागरिकांना पोलिसांना कळवण्याचे आवाहन केले आहे.






















