दिवाळीची अनोखी भेट! २० गरजू विद्यार्थ्यांना मिळणार रोजगारक्षम कौशल्य प्रशिक्षण
marathinews24.com
पुणे – Skill Development for Youth : दिवाळी म्हणजे आनंद, प्रकाश आणि भेटवस्तूंचा सण. मात्र या सणाला सामाजिक बांधिलकीची जोड देत संगणकतज्ज्ञ डॉ. दीपक शिकारपूर यांनी एक अभिनव उपक्रम राबविला. दिवाळीनिमित्त कपडे, मिठाई किंवा पारंपरिक भेटवस्तूंवर खर्च करण्याऐवजी आर्थिकदृष्ट्या गरजू आणि होतकरू अशा २० विद्यार्थ्यांना रोजगारक्षम कौशल्यांचे प्रशिक्षण देण्याचा संकल्प त्यांनी केला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना स्वावलंबनाची आणि उज्ज्वल करिअरची नवी संधी उपलब्ध होणार आहे.
चारा टंचाईवर मात करण्यासाठी कृषी विभाग सज्ज – सविस्तर बातमी
मल्टिव्हर्सिटी आणि शिकारपूर सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी (दि. ६) मल्टिव्हर्सिटी, बावधन येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कृत्रिम बुद्धिमत्ता, डिजिटल तंत्रज्ञान आणि वेगाने बदलणाऱ्या रोजगारविश्वात पारंपरिक शिक्षणाबरोबरच प्रत्यक्ष कामासाठी उपयुक्त कौशल्यांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. विशेषतः आर्थिक परिस्थितीमुळे आधुनिक प्रशिक्षणापासून वंचित राहणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना योग्य संधी मिळाल्यास ते स्वतःच्या पायावर उभे राहू शकतात. या हेतूने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
Skill Development for Youth भारताला विकसित राष्ट्र बनवायचे असेल, तर युवा पिढीला केवळ पदव्या नव्हे, तर आधुनिक तंत्रज्ञानाशी सुसंगत कौशल्ये दिली पाहिजेत. ज्ञान, कौशल्य आणि मूल्याधिष्ठित शिक्षण यांचा संगम घडविणारे असे उपक्रम देशाच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत,” असे प्रतिपादन ज्येष्ठ संगणक शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर यांनी केले. या उपक्रमामागील भूमिका स्पष्ट करताना डॉ. दीपक शिकारपूर म्हणाले, “दिवाळीत आपण कपडे, मिठाई आणि भेटवस्तूंवर मोठा खर्च करतो. या वर्षी मी वेगळा विचार केला. मिठाईचा गोडवा काही दिवस टिकतो, कपड्यांचे आकर्षण काही काळ राहते; पण एखाद्या गरजू विद्यार्थ्याला दिलेले रोजगारक्षम कौशल्य त्याचे संपूर्ण आयुष्य बदलू शकते. म्हणूनच २० होतकरू विद्यार्थ्यांना कौशल्य प्रशिक्षणाची दिवाळी भेट देण्याचा निर्णय घेतला. ही केवळ भेट नाही, तर त्यांच्या भविष्यामधील गुंतवणूक आहे.
डॉ. शिकारपूर पुढे म्हणाले, “आपण दिवाळीत घराघरांत दिवे लावतो; पण एखाद्या तरुणाच्या आयुष्यात रोजगाराचा आणि आत्मविश्वासाचा दिवा लावणे ही खरी सामाजिक दिवाळी आहे. दानापेक्षा कौशल्यदान अधिक दूरगामी परिणाम घडवू शकते. समाजातील सक्षम व्यक्ती आणि उद्योगांनी अशा उपक्रमांत सहभागी व्हावे.
उपक्रम केवळ २० विद्यार्थ्यांपुरता मर्यादित न राहता समाजात ‘कौशल्य भेट द्या, भविष्य घडवा’ ही नवी संस्कृती निर्माण करण्यास प्रेरणा देणारा ठरू शकतो. दिवाळीचा आनंद क्षणिक नसावा, तर एखाद्याच्या आयुष्यात कायमस्वरूपी प्रकाश निर्माण करणारा असावा, हाच या उपक्रमाचा संदेश आहे. मल्टिव्हर्सिटीचे व्यवस्थापकीय संचालक नचिकेत भटकर यांच्यासह भाग्यश्री जाधव, विश्वजीत उत्तरवार, श्रीरंग इनामदार, अनिता जाधव, विल्सन माळी उपस्थित होते.






















