मुंढव्यात दोन गुन्हे दाखल
marathinews24.com
पुणे – Pune Cyber Crime News : क्रेडिट कार्डवरील रिवॉर्ड पॉइंटचे पैशांत रूपांतर करून देण्याच्या बहाण्याने सायबर चोरट्यांनी मुंढवा परिसरातील दोघांची तब्बल १७ लाख ३० हजार रुपयांची फसवणूक केली. अक्सिस बँक आणि एयू स्मॉल फायनान्स बँकेचे कर्मचारी असल्याचे भासवून आरोपींनी संबंधितांशी संपर्क साधला. रिवॉर्ड पॉइंट रिडीम करण्याच्या प्रक्रियेच्या नावाखाली ओटीपी मिळवून दोघांच्या खात्यांतील रक्कम लंपास केली. याप्रकरणी मुंढवा पोलिस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत.
कौशल्यसंपन्न युवा पिढी घडविणे हीच विकसित देशाची खरी गुरुकिल्ली- डॉ. विजय भटकर – सविस्तर बातमी
Pune Cyber Crime News पहिल्या घटनेत वैष्णवी रविंद्र गव्हाणे (वय ३१, रा. एक्सेला ट्रिमोन, कोद्रे नगर, केशवनगर, मुंढवा) यांची १३ लाख ६९ हजार ९९९ रुपयांची फसवणूक झाली. सिताराम सैनी याने अक्सिस बँकेचा कर्मचारी असल्याचे सांगून त्यांच्याशी संपर्क साधला. क्रेडिट कार्डवरील रिवॉर्ड पॉइंटचे पैशांत रूपांतर करून देण्याचे आश्वासन देत त्याने गव्हाणे यांच्याकडून ओटीपी घेतला. त्यानंतर त्यांच्या पैशांची परस्पर विल्हेवाट लावली. दोन ते चार नोव्हेंबरदरम्यान हा प्रकार घडला. याप्रकरणी पाच नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल केला आहे.
दुसऱ्या घटनेत अविक कुमार चंदा (वय ४१, रा. पुर्वा सिल्वर सँड्स, केशवनगर, मुंढवा) यांची तीन लाख ५९ हजार ८०० रुपयांची फसवणूक झाली. अज्ञात व्यक्तीने एयू स्मॉल फायनान्स बँकेच्या कस्टमर केअरमधून बोलत असल्याचे सांगून त्यांच्याशी संपर्क साधला. क्रेडिट कार्डवरील रिवॉर्ड पॉइंट रिडीम करण्यासाठी बँकेच्या अँपवर तपासणी करण्यास सांगितले. त्यानंतर रिवॉर्ड पॉइंट सक्रिय करण्यासाठी व्यवहार मर्यादा वाढवावी लागेल, असे सांगून ऑनलाइन फॉर्म भरायला लावला. फॉर्ममध्ये ओटीपी टाकण्यास सांगून त्यांच्या खात्यातून रक्कम लंपास केली. २६ ऑक्टोबरला हा प्रकार घडला असून, याप्रकरणी पाच नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल केला आहे.
दोन्ही घटनांमध्ये बँकेचे कर्मचारी असल्याचे भासवून नागरिकांचा विश्वास संपादन करण्यात आला. त्यानंतर रिवॉर्ड पॉइंट रिडीम करण्याच्या नावाखाली ओटीपी मिळवून आर्थिक फसवणूक करण्यात आली. मुंढवा पोलिस या दोन्ही प्रकरणांचा तपास करीत आहेत.






















