पावणे चार कोटींचा गांजा जप्त; कस्टम विभागाने ठोकल्या विमान प्रवाशाला बेड्या
marathinews24.com
पुणे – Bangkok to Pune Drug Smuggling : बँकॉकहून अन्नपदार्थांच्या पॅकेटमधून तब्बल ३ कोटी ७२ लाख रुपये किमतीचा १० केली ६४२ ग्रॅम हायड्रोपोनिक गांजा पुण्यात आणण्याचा प्रयत्न कस्टम्स विभागाच्या एअर इंटेलिजन्स युनिटने हाणून पाडला. सुकामेवा आणि नूडल्सच्या पॅकेटमध्ये दोन थरांच्या काळ्या प्लास्टिकमध्ये व्हॅक्यूम सील करून हा गांजा लपविण्यात आला होता. पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर ४ नोव्हेंबरला केलेल्या कारवाईत भारतीय प्रवाशाला अटक केली आहे. न्यायालयाने त्याला १८ नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली.
एसआयआरचा फॉर्म भरण्याची बतावणीने गंडा – सविस्तर बातमी
बँकॉकहून एअर इंडिया एक्स्प्रेसच्या (आय एक्स-291) विमानाने हा प्रवासी पुणे विमानतळावर दाखल झाला होता. त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने कस्टम्सच्या एअर इंटेलिजन्स युनिटने त्याच्या सामानाची तपासणी केली. यावेळी त्याच्या ट्रॉली बॅगेत नूडल्सची पाकिटे आणि ‘फ्रीज ड्राय मंथोंग ड्युरियन’ या नावाने असलेल्या सुकामेव्याची नऊ चंदेरी पॅकेट्स आढळली. प्रथमदर्शनी ही नेहमीची खाद्यपदार्थांची पाकिटे वाटत होती. Bangkok to Pune Drug Smuggling मात्र, अधिकाऱ्यांनी संशयावरून त्यांची तपासणी केली असता, पॅकेटमध्ये काळ्या प्लास्टिकचे दोन थर आणि त्यामध्ये व्हॅक्यूम सील केलेल्या पिशव्या आढळल्या. त्या उघडून पाहिल्यानंतर त्यामध्ये पिवळसर-हिरव्या रंगाच्या वाळलेल्या फुलांच्या कळ्या आढळल्या. त्यातून उग्र वास येत होता. कस्टम्सच्या अमली पदार्थ तपासणी किटद्वारे चाचणी केली असता, हा हायड्रोपोनिक गांजा असल्याचे निष्पन्न झाले.
अधिकाऱ्यांनी १० किलो ६४२ ग्रॅम गांजा आणि तस्करीसाठी वापरलेले पॅकिंग साहित्य जप्त केले. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत अमली पदार्थाची किंमत ३ कोटी ७२ लाख रुपये आहे. याप्रकरणी एनडीपीएस कायदा १९८५ अंतर्गत गुन्हा दाखल करून संबंधित प्रवाशाला अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता, १८ नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले. तस्करांकडून अन्नपदार्थांच्या पॅकेटचा आडोसा घेऊन अमली पदार्थांची वाहतूक करण्याचा प्रयत्न होत असल्याने विमान तळावरील तपासणी यंत्रणांसमोर नवे आव्हान निर्माण झाले आहे. कस्टम विभागाचे पोलिस उपायुक्त धिरज मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली.























