नियमबाह्य कर्जवाटप; तत्कालीन पदाधिकाऱ्यांसह कर्जदार, एजंटांवर गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – जय भवानी सहकारी बँकेत कर्जवाटप करताना नियमांचे उल्लंघन करून साडेचार कोटी रुपयांहून अधिक रकमेचा आर्थिक गैरव्यवहार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. बँकेतील तत्कालीन पदाधिकारी, अधिकारी, कर्जदार आणि एजंट यांनी संगनमत करून कर्जदारांची पात्रता नसतानाही नियमबाह्य पद्धतीने कर्ज मंजूर केले. याप्रकरणी खडक पोलिस ठाण्यात २१ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नवले पुलाजवळ तरुणाचा मोबाइल हिसकावला – सविस्तर बातमी
राजेंद्र सिताराम कांबळे (वय ५६, रा. श्री स्वामी समर्थ सहकारी गृहरचना संस्था, पाषाण-सूस रस्ता, पाषाण) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, भवानी पेठेतील पवार बिल्डिंगमधील जय भवानी सहकारी बँकेत २०१६ ते २०१८ या कालावधीत हा गैरव्यवहार झाला. आरोपींनी परस्पर संगनमत करून आपल्या पदाचा गैरवापर केला. स्वतःच्या तसेच संपर्कातील कर्जदार आणि एजंटांच्या आर्थिक फायद्यासाठी कर्जवाटपाचे नियम धाब्यावर बसवले.
भारतीय रिझर्व्ह बँकेची परिपत्रके, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० आणि त्यातील नियम १९६१ मधील तरतुदी, बँकेचे उपविधी तसेच कर्जविषयक धोरणांचे उल्लंघन करण्यात आले. कर्जदारांची आर्थिक पात्रता नसतानाही रिक्षा कर्जासह अन्य तारण कर्जप्रकरणांना मंजुरी देण्यात आली. यासाठी बँकेतील ठेवीदार आणि सभासदांच्या ठेवींचा गैरवापर करून बँकेची तसेच ठेवीदारांची फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
प्रकरणात राजेंद्र दत्तात्रय पडवळ, रतन घनश्याम किराड आणि बँकेचे तत्कालीन उपाध्यक्ष संजय सोपान गायकवाड यांच्यासह अन्य आरोपींचा समावेश आहे. या गैरव्यवहारातून चार कोटी ४६ लाख ५५ हजार १२६ रुपयांचा आर्थिक घोटाळा आणि अपहार झाल्याचा आरोप आहे. याप्रकरणी खडक पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.






















