खराडीतील कंपनीच्या संचालकासह साक्षीदाराविरुद्ध गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – शेअर बाजारात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) तंत्रज्ञानाच्या मदतीने ट्रेडिंग करून दरमहा १५ ते २० टक्के हमखास परतावा देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची एक कोटी ६१ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. महाट्रेड आणि ट्रेडवे या दोन मोबाइल अपच्या माध्यमातून हा प्रकार करण्यात आला.
पैसे परत मागितल्याने तरुणावर कोयत्याने वार – सविस्तर बातमी
महेश सुरेश जाधव (वय ३१, रा. साईविहार कॉलनी, काळेपडळ, हडपसर; मूळ रा. मंगरूळ, ता. कळंब, जि. धाराशिव) यांनी खराडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरून सुहास जालिंदर फाटा आणि देविदास जालिंदर रायकर (दोघेही रा. पिंपळगाव रायकर, जि. अहिल्यानगर) महाट्रेड कंपनीचे अन्य संचालक आणि मदत करणाऱ्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खराडीतील डाउनटाउन रोडवरील सिटी व्हिस्टा इमारतीत महाट्रेड कंपनीचे कार्यालय आहे. कंपनीने महाट्रेड आणि ट्रेडवे ही दोन अप्लिकेशन्स गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध करून दिली होती. ही अप्लिकेशन्स एआय प्रणालीवर काम करतात आणि त्याद्वारे शेअर बाजारात ट्रेडिंग करून दरमहा १५ ते २० टक्के निश्चित नफा मिळवून दिला जाईल, असे गुंतवणूकदारांना सांगण्यात आले होते. या आमिषाने तक्रारदार आणि त्यांच्या ओळखीच्या गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन करण्यात आला.
शेअर बाजारातील ट्रेडिंगचे खोटे आर्थिक व्यवहार दाखवून गुंतवणूकदारांकडून पैसे स्वीकारण्यात आले. प्रत्यक्षात ही रक्कम शेअर बाजारात गुंतविण्याऐवजी आरोपींनी स्वतःच्या फायद्यासाठी विविध बँक खात्यांवर वळविल्याचे तक्रारीत नमूद आहे. गुंतवणूकदारांनी एकूण दोन कोटी २८ लाख ८८ हजार ९५० रुपये गुंतविले होते. त्यापैकी केवळ ६७ लाख २२ हजार ७६२ रुपये परत करण्यात आले. उर्वरित एक कोटी ६१ लाख ६४ हजार ४०९ रुपये आणि आश्वासित परताव्याच्या रकमेचा अपहार करून फसवणूक करण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधांचे संरक्षण (एमपीआयडी) कायद्यानुसारही कलम केली. खराडी पोलिस तपास करीत आहेत.






















