सासऱ्यासह मेहुणा अटकेत
marathinews24.com
पुणे – Lonikand Police Arrest : कौटुंबिक वादातून तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार करुन त्याचा खून करण्यात आल्याची घटना पुणे-अहिल्यानगर रस्त्यावरील कोलवडी गावात घडली. या प्रकरणी लोणीकंद पोलिसांनी तरुणाच्या सासऱ्यासह मेहुण्याला अटक केली. सुलतान सादिक शेख (वय २४, रा. शिवनेरी, कोंढवा) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी सासरे रहीम मोहम्मद शेख (वय ६५), अमन रहीम शेख (वय ४५, रा. कोलवडी, ता. हवेली, जि. पुणे) यांना अटक केली. याबाबत सुलतानचा भाऊ साबीर (वय २६) याने लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फटाके उडविताना झालेल्या वादातून खुनाचा प्रयत्न – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुलतान याचा पत्नीबरोबर वाद झाला होता. वादातून ती माहेरी निघून आली होती. ९ नोव्हेंबर रोजी सुलतानच्या आई-वडील माहेरी गेले. तिला घेऊन ते सासरी आले. दरम्यान, सुलतान हा कोलवडी गावात राहणाऱ्या सासऱ्याच्या घरी गेला. (Lonikand Police Arrest) पत्नी माहेरी आली का? याबाबत त्याने विचारणा केली. या कारणावरुन सुलतानचा सासरे रहीम आणि मेहुणा अमन यांच्याशी वाद झाला. वादातून त्यांनी सुलतानवर तीक्ष्ण शस्त्राने वार केले. या घटनेत तो गंभीर जखमी झाला.
या घटनेची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी त्याला रुग्णालयात दाखल केले. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याची माहिती वैद्यकीय तज्ज्ञांनी दिली. पोलीस निरीक्षक पवार तपास करत आहेत.




















