चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – शहरातील कोंढव्यातील टिळेकरनगर भागात दोन सोसायटींमधील ८ फ्लॅटचे कुलूप तोडून चोरीचा प्रयत्न करण्यात आला. चोरट्यांनी एका सदनिकेतून ५१ हजार रुपयांचा ऐवज लांबविला. या प्रकरणी येवलेवाडी पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला. याबाबत नीलेश चंद्रकांत टकले (वय ३६, रा. ओम हाईट्स, टिळेकरनगर, कोंढवा) यांनी येवलेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
२५ दिवसांत १० हजार किलोमीटरचा प्रवास करून उघडकीस आणला गुन्हा – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टिळेकरनगर भागात आयुष हाईट्स आणि अमृता होम सोसायटी आहे. दिवाळीनिमित्त या सोसायटीतील काही जण बाहेरगावी गेले आहेत. शुक्रवारी (१३ नोव्हेंबर) मध्यरात्री चोरट्यांनी या सोसायटीतील रहिवासी नीलेश टकले, अविनाश सूर्यवंशी, दिनेश सुतार, सवाईसिंग टिकमसिंग, खंडू सोंडगे, आनंदचंद्र जाधव, अनिल काळे, अमोल कचवे यांच्या बंद सदनिकांचे कुलूप तोडले. चोरट्यांनी कचवे यांच्या सदनिकेतील कपाट उचकटून ५१ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लांबविले. एकाच भागातील दोन सोसायटींमधील सदनिकांचे कुलूप तोडून चोरीचा प्रयत्न करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर घबराट उडाली. पोलीस उपनिरीक्षक विटे तपास करत आहेत.
क्रेनच्या चाकाखाली सापडून एकाचा मृत्यू
क्रेनच्या चाकाखाली सापडून रस्त्याच्या कडेला झोपलेल्या एकाचा मृत्यू झाल्याची घटना एनडीए रस्त्यावरील उत्तमनगर भागात घडली. याप्रकरणी क्रेन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चंद्रकांत शंकर शिंदे (वय ४२, रा. भैरवनाथनगर, कोंढवे धावडे) असे मृत्युमुखी पडलेल्यांचे नाव आहे. क्रेन चालक विश्राम रामजीत प्रसाद (वय ४०, रा. शिवणे ओैद्योगिक वसाहत, एनडीए रस्ता) याला ताब्यात घेण्यात आले असून, त्याला पोलिसांनी नोटीस बजावली आहे. नंदा रंगनाथ माळवे (वय ५४, रा. वीर, ता. पुरंदर, जि. पुणे) यांनी उत्तमनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रकांत शिंदे हे एनडीए रस्त्यावरील अचानक चौकाजवळ रस्त्याच्या कडेला झोपले होते. बुधवारी (१२ नोव्हेंबर) सायंकाळी सव्वासातच्या सुमारास तेथून निघालेल्या क्रेनच्या चाकाखाली सापडून शिंदे यांचा जागीच मृत्यू झाला. पोलीस हवालदार थोरात तपास करत आहेत.



















