डॉ. प्रभा अत्रे पुरस्कृत ‘इंदिरा अत्रे बाल साहित्यकार’ पुरस्कारांचे वितरण
marathinews24.com
पुणे – Bharat Sasane Pune : मुलांना अद्भुत रसाची प्रचिती दिल्यामुळे त्यांची बुद्धी, कल्पनाशक्ती तरल होते, त्यांचा मनोविकास साधला जातो त्याच वयात त्यांच्यासाठी अत्यंत शुष्क माहिती बालसाहित्यातून दिली जाणे हा मोठा प्रमाद घडलेला आहे. हा प्रमाद का घडला, कोणी घडविला, हेतूपुरस्सर झाला की नकळतपणे झाला हा मुद्दा वादाचा भाग आहे. परंतु सद्य स्थितीत बालसाहित्याची निर्मिती होताना साहित्यिक पुन्हा एकदा अद्भुत रसाकडे येऊ लागले आहेत ही सकारात्मक बाब आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक, साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष भारत सासणे यांनी केले. कथेमधील घोड्यांना पंख असतात का या मुद्द्यावर चर्चा करण्याऐवजी मुलांच्या कल्पनाशक्तीला पंख निर्माण करणे ही महत्त्वाची बाब आहे, हा मुद्दा त्यांनी अधोरेखित केला.
विश्रांती हॉस्पिटल हे कर्करोग रुग्णांसाठी आशेचा किरण – अॅडमिरल मनीष होनवाड – सविस्तर बातमी
स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे पुरस्कृत ‘इंदिरा अत्रे बालसाहित्यकार’ पुरस्कारांचे वितरण शनिवारी (दि. १४) पत्रकार भवन येथे भारत सासणे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. २०२५ साली प्रसिद्ध झालेल्या गणेश मतकरी यांच्या ‘इअरफोन्स’ तर प्रणव सखदेव यांच्या ‘के कनेक्शन्स’ या किशोर-कुमारवयीन तसेच जेन-झी गटासाठी लिहिलेल्या पुस्तकाला रुपये पाच हजार, आश्लेषा महाजन यांच्या ‘गप्पी गप्पा आणि इतर कथा’ तसेच ऋषिकेश दाभोळकर, हर्षल कोऱ्हाळे यांच्या ‘कुल्फी’ दिवाळी अंक २०२५ या बाल साहित्यास रुपये तीन हजार तर अभिषेक जाखडे लिखित ‘जंगलातलं चांदणं’ या पुस्तकाच्या मुखपृष्ठ तसेच आतील चित्रांसाठी चित्रकार सई देशपांडे यांना दोन हजार रुपयांचा, तर विशेष उल्लेखनीय पुस्तक म्हणून श्रीपाद ब्रह्मे यांच्या ‘फुलपाखरू’ तर संजय ऐलवाड यांच्या ‘झिब्राची गोष्ट’ या पुस्तकास प्रत्येकी एक हजार रुपयांचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. रोख रक्कम व सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते. पुरस्काराचे यंदाचे चौथे वर्ष आहे. डॉ. प्रभा अत्रे फाऊंडेशनचे अध्यक्ष ॲड. अशोक वळसंगकर मंचावर होते. डॉ. प्रभा अत्रे फाऊंडेशनतर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
मोठ्यांसाठी साहित्य निर्मिती करणाऱ्या प्रतिभावान साहित्यिकांनी बालसाहित्य निर्माण करणे ही परंपरा मधल्या काळात खंडित झाली होती ती पुन्हा एकदा प्रस्थापित होताना दिसत आहे ही आनंददायक घटना आहे, असे सांगून भारत सासणे पुढे म्हणाले, बालमानस शास्त्रानुसार ज्या मुलांना अद्भुत रसाचे सेवन करता आले नाही ती मुले पुढे जाऊन अविकसित स्वरूपाची प्रौढ व्यक्ती बनते तसेच पोटार्थी होऊन त्यांच्यात शुष्कपणा येतो. Bharat Sasane Pune त्यांच्या मनात कलांबद्दलचे प्रेम निर्माण होत नाही. म्हणून मुलांमधील कल्पनाशक्ती साहित्यकृतीतून तरल करणे, त्यात अद्भुत रस, प्रयोगशीलता आणि भवतालाचा विचार असणे आवश्यक आहे. मराठी भाषेतील बालसाहित्याचा चेहरामोहरा बदलण्यासाठी या क्षेत्रात कार्य करणाऱ्या साहित्यिक, प्रकाशक, शिक्षक आणि पालक यांच्यात चर्चा होणे गरजेचे आहे, असेही त्यांनी सूचित केले.
पुरस्काराला उत्तर देताना गणेश मतकरी म्हणाले, किशोरवयीन व पौंगडावस्थेत वाचनाची गोडी लागली तर ही सवय टिकू-वाढू शकते परंतु ती गोडी लावणारे साहित्य निर्माण करताना कल्पनाशक्तीला पंख देणाऱ्या साहित्याबरोबरच अत्यंत वास्तववादी साहित्य देखील लिहिले जाणे आवश्यक आहे. हे साहित्य निर्वात पोकळीतील नको तर त्याला मुलांच्या जगण्याचा जीवंत संदर्भ असावा.
प्रणव सखदेव म्हणाले, अडनिड्या वयातील मुलांसाठी साहित्य निर्माण करताना त्यांच्या भावविश्र्वाची, त्यांना भेटणाऱ्या माणसांची कथा साहित्यकृतीतून मांडता आली पाहिजे. ज्यात त्यांच्या जगाचे काही तरी बोलणे-सांगणे आवश्यक आहे. असे साहित्य निर्माण झाल्यास ही पिढी मराठी भाषेतील साहित्य वाचनात ठेवेल आणि भाषा टिकून राहण्यास मदत होईल.
हर्षल कोऱ्हाळे म्हणाले, किशोरवयीन मुलांसाठी साहित्य निर्माण करताना ते सर्जनशील, बहुसांस्कृतिक आणि समकालीन असणे आवश्यक आहे. अश्लेषा महाजन म्हणाल्या, बालसाहित्य म्हणजे उत्सुकतेची तहान भागविणारी आनंदाची पाणपाई आहे. पुढील पिढीसाठी साहित्य निर्माण करताना अनेक आव्हानांना समोरे जावे लागणार आहे.
श्रीपाद ब्रह्मे म्हणाले, मोबाईलच्या विळख्यात अडकलेल्या पोंगडावस्थेतील पिढीला छापील साहित्याकडे वळविण्यासाठी त्यांच्या भावविश्र्वाला साजेसे साहित्य निर्माण होणे आवश्यक आहे. संजय ऐलवाड यांनी शहरी व ग्रामीण भागातील मुलांचे भावविश्र्व उलगडताना बालसाहित्याची निर्मिती कशी झाली याचा प्रवास सांगितला. बदलत्या काळानुसार बाल साहित्याची आवश्यकताही त्यांनी प्रतिपादित केली.
सई देशपांडे यांनी पुस्तकासाठी मुखपृष्ठ साकारताना ती साहित्यकृती संपूर्णत: जाणून घेत चित्रकलेच्या माध्यमातून प्रकट होते अशा भावना व्यक्त केल्या. प्रसाद भडसावळे यांनी पुरस्कारासाठी साहित्यकृती निवडताना कशी प्रक्रिया राबविली जाते याविषयी सविस्तर माहिती विशद केली.
ॲड. अशोक वळसंगकर यांनी मान्यवरांचा सत्कार केला. मिलिंद कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन केले.




















