सर्वसामान्य नागरिकांना पैशाचे आमिष दाखवून सायबर चोरटे मारत आहेत डल्ला
marathinews24.com
पुणे – सायबर चोरांकडून चौघांची ८२ लाख ३५ हजारांची फसवणूक – सर्वसामान्य नागरिक सायबर चोरांच्या आमिषाला बळी पडून त्यांचे लाखो रुपये गमावत आहेत. वारंवार पोलिस प्रशासन तसेच आवाहन करून देखील आपल्याकडील लाखो रुपये सायबर चोरांच्या हवाली करत आहेत. अशाच चार वेगवेगळ्या घटनांमध्ये सायबर चोरांनी चौघांची ८२ लाख ३५ हजार ९२ रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पुण्यात घरफोडी करणाऱ्या चोरट्यांचा उच्छाद – सविस्तर बातमी
आंबेगाव बुद्रुक येथील ४९ वर्षीय व्यक्तीने आंबेगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. २१ एप्रिल ते ९ जून या कालावधीत सायबर चोरांनी वेगवेगळ्या नावाने त्यांच्याशी संपर्क साधत, व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून ट्रेडिंगच्या माध्यमातून जादा परतावा मिळणार असे आमिष त्यांना दाखवले. आमिषाला बळी पडत तक्रारदाराने २३ लाख १९ हजार रुपयांची गुंतवणूक केली. त्यांना सुरूवातीला किरकोळ स्वरूपात परतावा मिळाला. मात्र, त्यानंतर कोणताही परतावा अथवा मूळ रक्कम परत न मिळाल्याने त्यांनी पोलिसांकडे जात तक्रार दिली. याप्रकरणी मोबाईल धारकासह काही लोकांविरोधात गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलिस निरीक्षक (गुन्हे) गजानन चोरमले करत आहेत.
वारजे येथील ४७ वर्षीय व्यक्तीला ११ नोव्हेंबर ते २१ डिसेंबर २०२४ या कालावधीत सायबर चोरांनी व्हॉट्सअप ग्रुपद्वारे संपर्क साधत शेअर मार्केटमध्ये जास्तीचा परतावा मिळेल असे आमिष दाखवले. या आमिषाला बळी पडून तक्रारदाराने २३ लाख ३९ हजार २०० रुपयांची गुंतवणूक केली. त्यानंतर तक्रारदाराला कोणताही परतावा अथवा मूळ रक्कम न मिळाल्याने त्यांनी वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पुढील तपास पोलिस निरीक्षक (गुन्हे) बडाख पुढील तपास करत आहेत. तिसऱ्या घटनेत, वडगाव शेरी येथील ३७ वर्षीय व्यक्तीला सायबर चोरांनी ७ ते ९ जुलै दरम्यान मेसेज करून रिव्ह्यू टास्कच्या माध्यमातून
चांगला परतावा मिळेल असे आमिष दाखवले. या आमिषाला बळी पडत तक्रारदाराने २७ लाख ७७ हजार ८९२ रुपयांची गुंतवणूक केली. त्यानंतर कोणताही परतावा अथवा मूळ रक्कम परत मिळाल्याने, तक्रारदाराला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी चंदननगर पोलिस ठाण्यात जात तक्रार दिली. पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक सीमा ढाकणे करत आहेत.
चौथ्या घटनेत, लोहगाव येथील एकाला एचडीएफसी क्रेडिट कार्ड डिपार्टमेंटमधून बोलत असल्याची बतावणी करत कुणाल नामक व्यक्तीने कार्डचा पीन नंबर विचारला. तक्रारदाराने पीन क्रमांक देताच त्यांच्या क्रेडीट कार्डवरून ७ लाख ९९ हजार रुपयांचे कर्ज काढत त्यांनी फसवणूक केली. त्यानंतर तक्रारदाराने विमानतळ पोलिस ठाण्यात जात तक्रार दिली. हा प्रकार २० जून रोजी घडला. पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक शेळके करत आहेत.






















