संगीत नाट्यप्रवेश स्पर्धेचे आयोजन
marathinews24.com
पुणे – संगीत रंगभूमीवरील प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री पद्मश्री जयमालाबाई शिलेदार यांची जन्मशताब्दी 2४ सप्टेंबर २०२५ पासून सुरू झालेली आहे. जयमालाबाई शिलेदार यांनी संगीत रंगभूमीची प्रदीर्घ सेवा केलेली आहे. संगीत क्षेत्रातील त्यांनी दिलेल्या योगदानाला अभिवादन करण्याकरता, एकपात्री कलाकार परिषद, महाराष्ट्र, कलांगण अकादमी, पुणे आणि निळू फुले कला अकादमी, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने खुली संगीत नाट्यप्रवेश स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
अमली पदार्थांविरोधात पुण्यात ‘पुणे वर्ल्ड मॅरेथॉन २०२५’ चे आयोजन – सविस्तर बातमी
संगीत रंगभूमीचा प्रदीर्घ आणि समृद्ध वारसा आपल्या मराठी रंगभूमीला लाभला आहे. हा वारसा जतन करण्याबरोबरच, संगीत रंगभूमीची आवड नवीन पिढीमध्ये निर्माण व्हावी, संगीत रंगभूमीसाठी नवीन कलाकार तयार व्हावेत तसेच संगीत रंगभूमीवरील अभिजात मराठी भाषेतील साहित्य, संगीत, नाट्य हे नवीन पिढीपर्यंत जाण्यासाठी हा उपक्रम उपयोगी ठरेल अशा उद्देशाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
स्पर्धा दोन गटात
अ) नाट्यपदांसहित पद्यमय नाट्यप्रवेश, ब) फक्त गद्य नाट्यप्रवेश – अशा पद्धतीने आयोजित करण्यात आली असून सर्वांसाठी, सर्व वयोगटासाठी खुली आहे. निळू फुले कला अकादमीच्या सभागृहात (लोकमान्य बँकेच्यावर, शास्त्री रोड, पुणे) येथे दि. ८ व ९ नोव्हेंबर २०२५ या दिवशी ही स्पर्धा होणार आहे. दि. ८ ऑक्टोबर पर्यंत स्पर्धक संघांनी ऑनलाइन पद्धतीने प्रवेश अर्ज भरायचा आहे. दोन्ही गटांमध्ये मिळून सांघिक प्रथम, द्वितीय, तृतीय तसेच वैयक्तिक स्वरूपात अभिनय, गायन, संगीतसाथ यासाठी सुद्धा बक्षिसे दिली जाणार आहेत.
स्पर्धेसंदर्भात संजय गोसावी (९८९०५००५३४), पल्लवी परब-भालेकर (९९६७५८२८२५) यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
या स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी होऊन, संगीत रंगभूमीचा समृद्ध वारसा जतन करण्यासाठी सक्रिय योगदान द्यावे, असे आवाहन दीपक रेगे, अस्मिता चिंचाळकर, संजय गोसावी, आशुतोष नेर्लेकर, पल्लवी परब-भालेकर यांनी केले आहे.





















