जेधे सोशल फाउंडेशन आणि इंद्राणी बालन फाउंडेशनचा उपक्रम; गरजू विद्यार्थ्यांना ३०० मोफत सायकल वाटप
marathinews24.com
पुणे -उत्सव हे सर्वांनी एकत्र येत आनंद घेण्यासाठी असतात. सणांच्या माध्यमातून सामाजिक वारसा जपायला हवा. समाजातील सगळ्या घटकांना एकत्र घेत सण साजरे करण्याची परंपरा आपण जपायला हवी, असे प्रतिपादन पुण्याच्या महापौर मंजूषा नागपुरे यांनी केले. निमित्त होते ‘अभिनव बालगोपाळ सायकल दहीहंडी’ या उपक्रमाचे. शुक्रवार पेठेतील पंचमुखी मारुती मंदिराजवळ अनोखी अशी सायकल दहिहंडी फोडण्यात आली. या निमित्ताने जेधे सोशल फाउंडेशन आणि इंद्राणी बालन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ३०० गरजू विद्यार्थ्यांना मोफत सायकलींचे वाटप करण्यात आले.
महिला पोलिसांसाठी स्वतंत्र समुपदेशन व मदत यंत्रणा उभारावी : डॉ. नीलम गोऱ्हे – सविस्तर बातमी
यावेळी व्यासपीठावर इंद्राणी बालन फाउंडेशनचे अध्यक्ष पुनीत बालन, अक्कलकोट राजघराण्याचे वंशज श्रीमंत मालोजीराजे तिसरे, भाजपाच्या महाराष्ट्र प्रदेश सचिव अॅड. वर्षा डहाळे, नगरसेवक अविनाश बागवे, गौरव बोराडे आणि जेधे सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष व श्री शिव छत्रपती मित्र मंडळाचे अध्यक्ष कान्होजी दयानंद जेधे आदी मान्यवर उपस्थित होते.
कान्होजी जेधे म्हणाले, सायकल दहीहंडी ही संकल्पना राबवणारे आमचे पहिलेच मंडळ आहे. जन्माष्टमी हा बाळगोपाळांचा सण असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची शाळेत पोहोचण्याची अडचण लक्षात घेऊन आम्ही दहीहंडी हा उत्सव अनोख्या पद्धतीने साजरे करायचे ठरवले. यंदा सायकल हंडीचे हे तिसरे वर्ष असून यंदा ३०० विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप करण्यात आले. शाळेत जाण्यासाठी दळणवळणाची सुविधा उपलब्ध व्हावी आणि त्यांच्या शिक्षणात अडथळे येऊ नयेत, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
आंबेगाव व जुन्नर तालुक्यातील माळीण, अंबसरी बुद्रुक, शिरोली, नारायणगाव, ओझर, भीमाशंकर, शिरोली खुर्द आदी अतिदुर्गम भागातील गावांमधील, तसेच पुण्यातील वस्ती भागातील विद्यार्थ्यी, पालक व शिक्षक यावेळी उपस्थित होते. मागील २ वर्षात भोर, वेल्हे, मुळशी, मावळ या गावांतील मुलांना सायकलींचे वाटप करण्यात आले होते. यावेळी बाळगोपाळांच्या हस्ते सायकल दहीहंडी फोडण्यात आली. नादब्रम्ह आणि तालचक्र ढोलपथकांनी वादनाने कार्यक्रमात विशेष रंगत आणली.






















