मांजरी, केसनंद परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ
marathinews24.com
पुणे – इलेक्ट्रिकल दुकानाचे शटर उचकटून चोरट्यांनी तांब्याची तार, स्क्रॅपसह दुचाकी असा मिळून ५ लाखांचा ऐवज चोरुन नेला आहे. ही घटना २७ मार्चला मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास मांजरी परिसरातील विजय इलेक्ट्रिकल्स वर्कस अॅड सेल्स दुकानात घडली आहे. याप्रकरणी वाघोलीत राहणार्या व्यावसायिकाने मांजरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
बारामतीत रहदारीस अडथळा ठरणाऱ्या १९ कंटेनर वाहनांवर दंडात्मक कारवाई – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे वाघोलीत राहायला असून, मांजरी परिसरात त्यांचे विजय इलेक्ट्रिकल्स वर्कस अॅड सेल्स नावाचे दुकान आहे. २७ मार्चला चोरट्यांनी त्यांच्या बंद दुकानाचे शटर उचकटून आतमध्ये प्रवेश केला. दुकानातील तांब्याच्या तारा, स्क्रॅप मटेरियल, दुचाकी असा ५ लाखांचा ऐवज चोरुन नेला. दुसर्या दिवशी दुकान उघडण्यासाठी आलेल्या तक्रारदाराला चोरी झाल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी पोलीस अमलदार पवार तपास करत आहेत.
केसनंद मध्ये घरफोडी, दोन लाखांचा ऐवज चोरीला
बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी ३० हजारांची रोकड, सोन्या-चांदीचे दागिने मिळून २ लाख १४ हजारांचा ऐवज चोरुन नेला आहे. ही घटना ३१ ऑगस्ट ते १ सप्टेंबर कालावधीत लोणीकंद केसनंद रोडवरील दुर्वांकुर पार्कमध्ये घडली आहे. याप्रकरणी केसनंदमध्ये राहणार्या तरुणाने वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुण कुटूंबियासह लोणीकंद केसनंद रोडवरील दुर्वांकुर पार्कमध्ये राहायला आहे. ३१ ऑगस्ट ते १ सप्टेंबर कालावधीत त्यांचे घर बंद होते. त्यावेळी चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडुन आतमध्ये प्रवेश केला. कपाटातील ३० हजारांची रोकड, सोन्या-चांदीचे दागिने असा २ लाख १४ हजारांचा ऐवज चोरुन नेला. याप्रकरणी दुसर्या दिवशी तक्रारदाराला घरात चोरी झाल्याचे दिसुन आले. त्यानुसार त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक महेश गळगटे तपास करीत आहेत.





















