शनिवारी दिवसभर सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल; वैभव वाघ यांची पत्रकार परिषदेत माहिती
marathinews24.com
पुणे – दहीहंडी हा महाराष्ट्रभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जाणारा उत्सव आहे. या उत्सवाचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व लक्षात घेऊन आनंदनाथ ट्रस्ट आणि राष्ट्रप्रथम ट्रस्ट यांनी अनोखी दहीहंडी साजरी करायचे ठरवले आहे. ‘पुण्याच्या अभिमानाची दहीहंडी, पुण्याची सोन्याची दहीहंडी’ या संकल्पनेअंतर्गत हा दहीहंडी उत्सव साजरा करण्यात येणार आहे. या दहीहंडी महोत्सवाच्या निमित्ताने पुणेकरांना कोकणातील प्रसिद्ध ‘दशावतार’ नाट्य अनुभवता येणार आहे, अशी माहिती पुणे दहीहंडी उत्सवाचे अध्यक्ष वैभव वाघ व सहकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पुण्यात गणशोत्सवात चार बेस, चार टॉपची मर्यादा – सविस्तर बातमी
वैभव वाघ म्हणाले, “दहीहंडीच्या निमित्ताने ४ आणि ५ सप्टेंबर रोजी विविध सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. कोकणाची ८०० वर्षांची समृद्ध परंपरा असलेल्या ‘संयुक्त दशावतार’ हा प्रयोगाने या उत्सवाचा प्रारंभ होणार आहे. शुक्रवारी (ता. ४) रात्री ८.३० वाजता बालगंधर्व रंगमंदिरात हा प्रयोग होणार असून, या कार्यक्रमाला गृहराज्यमंत्री योगेश कदम, पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित असणार आहेत.”
शनिवारी (ता. ५) महाराणा प्रताप बागेसमोरील मधुकर चिमणराव पोतनीस रस्ता येथे मुख्य दहीहंडीचा उत्सव साजरा केला जाणार आहे. यामध्ये सकाळी ८ वाजता सामुहिक भगवद्गीता पठणाचा कार्यक्रम होईल. त्यानंतर सुप्रसिद्ध विवेचनकार डॉ. संजयजी मालपाणी यांचे गीतेवर विवेचन असेल. दुपारी १ ते ४ ‘आपकी फर्माईश’ मध्ये नागरिकांच्या आवडीची गाणी ऐकता येतील. सायंकाळी ५ वाजता ‘ढाक्कू माकुम’ (कोकणचे बाल्या नृत्य) पुण्यात वास्तव्यास असणाऱ्या कोकणवासी बांधवांसाठी आणि पुणेकरांसाठी कोकणच्या पारंपरिक ‘बाल्या नृत्याचे’ आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ५.३० वाजता उत्तर महाराष्ट्र आणि खानदेशची ओळख असणारे सुप्रसिद्ध अहिराणी लोकनृत्य म्हणजेच ‘बारा पावली’ नृत्य सादर केले जाणार आहे. त्यानंतर सायंकाळी ६ नंतर मुख्य दहीहंडी उत्सव साजरा होईल. तरी जास्तीत जास्त नागरीकांनी या उत्सवात सहभागी व्हावे असे आवाहन वैभव वाघ यांनी यावेळी केले.





















