प्लाझ्मा, प्रेशर मीड, लेझर लाईटला बंदी- पोलीस आयुक्त अमितेश कुमार
marathinews24.com
पुणे – गणेशोत्सवात ‘चार बेस, चार टॉपची मर्यादा असून, त्यापुढे ध्वनिक्षेपकाची संख्या वाढल्यास डेसिबल मर्यादा ओलांडली जाते. त्यामुळे अशा ध्वनियंत्रणांना परवानगी देणे योग्य ठरणार नाही. प्रामुख्याने प्रेशर मीड, प्लाझ्मा, लेझर लाईटला बंदी घातली आहे. गणेश मंडळांनी चार बेस आणि चार टॉपच नियंत्रणात वाजवावेत, असे आवाहन पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी केले. स्वारगेटमधील गणेश कला क्रिडा मंचावर आयोजित दहीहंडी व गणेशोत्सव मंडळ समन्वय बैठकीत ते बोलत होते.
पुण्यात विद्यानंद बापट यांना मारहाण, पुणेकरांच्या संतप्त प्रतिक्रिया – सविस्तर बातमी
पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले, गणेशोत्सव उत्साहात पार पाडण्यासाठी पोलीस दल मंडळांसोबत ठामपणे उभे आहे. मंडळांनी यापूर्वी पोलिसांवर दाखवलेला विश्वास पुढे कायम राहील. उत्सव काळात पोलिस अधिकारी व कर्मचारी प्रामाणिकपणे, पारदर्शकपणे आणि मेहनतीने काम करतील. डीजेची संख्या वाढवल्याने आवाजाची मर्यादा ओलांडून नियमांचे उल्लंघन होते. मंडळांनी चार बेस व चार टॉपच्या मर्यादेत ध्वनी ठेवावे. नियमांचे पालन न झाल्यास कायद्यानुसार कारवाई केली जाईल. मात्र, उत्सवात गुन्हे दाखल करण्याची पोलिसांची मानसिकता नसून समन्वयाने उत्सव पार पाडण्याला प्राधान्य द्यावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
प्रत्येक पोलीस ठाणे प्रमुखाने गणेश मंडळांच्या ठिकाणी जाऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याच्या सूचना दिल्या आहेत. वाहतूक, गर्दीचे व्यवस्थापन, महिला सुरक्षा, स्थानिक समस्या पाहून त्यावर उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. दरम्यान, मंडळांना परवानगी मिळण्यास उशीर होऊ नये, यासाठी मागील परवानग्या ग्राह्य धरून आवश्यक प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचेही अमितेश कुमार यांनी सांगितले. तसेच गणेशोत्सव आणि दहीहंडीमध्ये लेझर लाईटचा वापर करू नये . उत्सवांमध्ये अश्लील कार्यक्रम आयोजित करू नयेत. अशा कार्यक्रमांसाठी आधीच पैसे देऊन नंतर पोलिसांकडे परवानगी मागण्याची वेळ येऊ नये, असेही त्यांनी सांगितले.
कायद्याची मर्यादा ओलांडल्यास कारवाई
सोशल मीडियावर कोणत्याही विषयावर मर्यादा सोडून वक्तव्य करू नये. कायद्याची मर्यादा ओलांडल्यास पोलिसांकडून कारवाई केली जाईल. मंडळांच्या पदाधिकार्यांनी संयम राखावा. दरम्यान, मंडळांच्या परिसरातील रस्त्यांची स्थिती, प्रकाश व्यवस्था वाहतुकीच्या अडचणींबाबत पोलिसांनी महापालिकेशी समन्वय साधून प्रश्न सोडवावेत. आवश्यक ठिकाणी अतिरिक्त प्रकाशव्यवस्था करण्यासाठी महापालिकेकडे प्रस्ताव पाठविला आहे. दरम्यान, दहीहंडीनिमित्त शहीद तुकाराम ओंबळे यांच्या कुटुंबीयांचा सन्मान करण्याचा उपक्रम राबविण्यात आला.
काय आहे साउंडचा बेस
बेस म्हणजे साउंड सिस्टीममधून येणारा जड आणि धडधडणारा आवाज. ढोल, ताशा किंवा गाण्यातील खालच्या पट्टीचा आवाज बेसमधून येतो. मोठा बेस स्पीकर जास्त हवा हलवतो, त्यामुळे आवाजासोबत कंपनेही जाणवतात. साउंड सिस्टीममध्ये बेसचा वापर प्रामुख्याने जड आवाजासाठी केला जातो.
टॉप म्हणजे काय
टॉप म्हणजे साउंड सिस्टीममधून आवाज स्पष्ट ऐकवणारा स्पीकर. गायकाचा आवाज, गाण्याचे शब्द, भाषण आणि वाद्यांमधील बारीक आवाज टॉप मधून ऐकू येतात. टॉपमध्ये मध्यम आणि तीव्र आवाज तयार होतो. त्यामुळे गाणे किंवा भाषण दूरपर्यंत स्पष्टपणे ऐकवण्यासाठी टॉपचा उपयोग केला जातो.
शहरातील गणेश मंडळांनी अमली पदार्थांविरोधातील जनजागृतीत पुढाकार घ्यावा. अमली पदार्थांना थारा मिळणार नाही, अशी भूमिका मंडळांनी घ्यावी. पोलिसांच्या सूचनांचे पालन करुन उत्साहात गणेशोत्सव साजरा करण्यास प्राधान्य द्यावे.
अमितेश कुमार, पोलीस आयुक्त





















