टिळक रस्त्यावर गणेश प्रेमीकडून मारहाण
marathinews24.com
पुणे – गणशोत्सवासह इतर कार्यक्रमात कर्णकर्कश डीजे वादनाला सातत्याने विरोधी करणारे आणि अल्पवधीतच नागरिकांच्या पसंतीत आलेले विद्यानंद बापट यांना मारहाण झाली आहे. वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीसोबत संवाद साधताना प्रतिष्ठानच्या माजी अध्यक्षाने बापट यांना कानशिलात लगावली. ही घटना गुरुवारी (दि.३) सकाळी साडेअकराच्या सुमारास टिळक रस्त्यावर घडली आहे. दरम्यान, या घटनेचा पुणेकरांना निषेध व्यक्त करीत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. विविध सामाजिक, राजकीय संघटनांनी मारहाणीचा निषेध व्यक्त केला आहे. याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
डीजे वादनाविरोधात विद्यानंद बापट यांनी भूमिका घेतली असून, त्यासंदर्भात मागील काही दिवसांपासून ते प्रचंड चर्चेत आले आहेत. दरदिवशी विविध इलेक्ट्रॉनिक माध्यमांसोबत संवाद साधून डीजे विरोध का आहे, याची अभ्यासपुर्ण मांडणी करीत आहेत. अशातच गुरूवारी सकाळी अकराच्या सुमारास खासगी वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधींनी बापट यांना भूमिका मांडण्यासाठी टिळक रोडवर बोलावले होते. त्याठिकाणी ते संबंधित बातमीदाराने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देत होते. त्यावेळी रस्त्याच्या दोन्ही बाजूला नागरिकांसह तरुण-तरूणींची प्रचंड गर्दी झाली होती. त्याचवेळी गर्दीतील एकाने थेट बापट यांच्या कानशिलात लगावली. याची भूमिका गणेश विरोधी आहे, याला खूप मारले पाहिजे, असे म्हटले. त्याचवेळी परिसरातील नागरिकांसह वृत्तवाहिनीच्या कॅमेरामॅन सह प्रतिनिधींनी बापट यांचा बचाव करून त्यांना दूर नेले. दरम्यान, जो गणेशोत्सविरोधात बोलणार त्याला असेच कानपट्टया देणार, असे हल्लेखोराने सांगितले. संबंधित हल्लेखोर कोथरुडमधील राउतवाडी असून, तो एका प्रतिष्ठानचा माजी अध्यक्ष आहे. त्याच्या शोधार्थ पोलीस पथक रवाना झाले आहे.
बैठकीतून बाहेर काढले, अन बापट चर्चेत आले
उत्सवादरम्यान डीजे वादनामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. त्यापार्श्वभूमीवर डीजे मुक्त गणेशोत्सवाची महापालिकेत बैठक पार पडली. गणेश मंडळासह महापालिका, पोलीस प्रशासन, सामान्य नागरिकांनी सहभाग घेतला होता. त्यावेळी विद्यानंद बापट यांनी डीजे वादनाला प्रखर विरोध दर्शविला होता. त्यामुळे त्यांना बैठकीतून बाहेर काढण्यात आले. त्यानंतर मात्र, बापट यांना डीजे वादन विरोधातील मोहिमेला सोशल मीडियावर प्रचंड पाठिंबा मिळाला. त्यांनी अनेक वृत्तवाहिन्यांसह पॉडकॉस्ट, युट्यूबरसोबत मुलाखती देउन डीजे वादन विरोधी भूमिका मांडली. मराठी भाषेवरील प्रभुत्व, शांतपणे भाषेतून उत्तर देण्याची कला, डीजे वादन का नसावे, याचे त्यांनी दिलेले स्पष्टीकरण पुणेकरांना भावले.
पोलिसांच्या विशेष शाखेचा हलगर्जीपणा
डीजे विरोधात भूमिका मांडणारे विद्यानंद बापट यांच्या विरोधात कटकारस्थान रचले जाऊ शकते. त्यांना मारहाण होउ शकते, बापट यांना पोलिसांनी सुरक्षा दिली पाहिजे, यासंदर्भात सोशल मीडियावर सातत्याने चर्चा सुरू होती. मात्र, पुणे पोलिसांच्या विशेष शाखा (एसबी) माहिती गोळा करण्यात अपयशी ठरली. वृत्तवाहिनीसोबत संवाद साधताना बापट यांच्यावर एकाने हल्ला केला. त्यामुळे याला जबाबदार कोण, एसबी विभागाचा गलथानपणामुळे बापट यांना सुरक्षा मिळाली नाही. त्यामुळे त्यांच्यावर हल्ला झाल्याची चर्चा आहे.





















