अश्विनी पौळ यांच्या दुर्दैवी घटनेनंतर धाराशिवच्या पोलीस अधीक्षक रितु खोखर यांच्याशी चर्चा; महिला पोलीस निरीक्षकाची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यास सकारात्मक प्रतिसाद
marathinews24.com
मुंबई – धाराशिव जिल्ह्यातील नळदुर्ग किल्ल्यावर राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू तथा महाराष्ट्र सुरक्षा दलात कार्यरत राहिलेल्या अश्विनी मनोहर पौळ यांनी आपल्या तीन चिमुकल्यांसह जीवघेणे पाऊल उचलल्याची घटना अत्यंत हृदयद्रावक आहे. या घटनेमुळे आपण व्यथित झालो असून अश्विनी पौळ आणि मृत बालकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते, अशा शब्दांत शिवसेना नेत्या तथा विधान परिषद सदस्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दुःख व्यक्त केले. उपचाराधीन बालिकेच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी प्रार्थनाही त्यांनी केली.
“महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्यास त्यांना अधिक सुरक्षित आणि स्वावलंबी जीवन जगता येते, अशी आपली भूमिका आहे. मात्र, अश्विनी यांच्यावर नोकरी सोडण्यासाठी पतीकडून दबाव आणण्यात आला आणि त्यातून त्यांनी नोकरी सोडल्याची माहिती समोर येत आहे. तीन लहान मुलांची जबाबदारी सांभाळताना त्यांना कोणत्या आर्थिक, कौटुंबिक आणि मानसिक आव्हानांचा सामना करावा लागला असेल, याचा गांभीर्याने विचार होणे आवश्यक आहे. या सर्व बाबींची संवेदनशीलतेने चौकशी झाली पाहिजे,” असे डॉ. गोऱ्हे म्हणाल्या.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर डॉ. गोऱ्हे यांनी धाराशिवच्या पोलीस अधीक्षक रितु खोखर यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. धाराशिव पोलीस दलातील महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना त्यांच्या कौटुंबिक, वैवाहिक किंवा मानसिक अडचणी विश्वासाने आणि गोपनीयपणे मांडता याव्यात, यासाठी स्वतंत्र अंतर्गत मदत व समुपदेशन व्यवस्था निर्माण करण्याचा प्रस्ताव त्यांनी मांडला.
या व्यवस्थेमध्ये महिला पोलिसांसाठी स्वतंत्र हेल्पलाइन, गोपनीय समुपदेशन तसेच त्यांच्या समस्यांचा आस्थापना स्तरावर पाठपुरावा आणि निराकरण करण्याची सुविधा असावी, अशी सूचना डॉ. गोऱ्हे यांनी केली. पोलीस अधीक्षक रितु खोखर यांनी या प्रस्तावाला तत्काळ सकारात्मक प्रतिसाद दिला. या कामासाठी एका महिला पोलीस निरीक्षकाची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्याबाबतही त्यांनी आश्वस्त केल्याची माहिती डॉ. गोऱ्हे यांनी दिली.
“काही पोलीस कर्मचाऱ्यांच्या व्यसनाधीनतेमुळे त्यांच्या पत्नी आणि कुटुंबीयांना त्रास सहन करावा लागत असल्याच्या तक्रारी अनेक वर्षांपासून माझ्याकडे येतात. त्याचप्रमाणे पोलीस दलात कार्यरत महिलांनाही विविध कौटुंबिक आणि मानसिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. या समस्या वैयक्तिक म्हणून दुर्लक्षित न करता त्यांचे वेळीच समुपदेशन आणि संस्थात्मक पातळीवर निराकरण होणे आवश्यक आहे,” असे डॉ. गोऱ्हे यांनी नमूद केले.
संकट कितीही गंभीर किंवा असह्य वाटत असले तरी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नये. आपल्या अडचणी कुटुंबीय, विश्वासू व्यक्ती, वरिष्ठ अधिकारी किंवा समुपदेशकांसमोर मोकळेपणाने मांडून मदत घ्यावी. प्रत्येक व्यक्तीचे जीवन तिच्या आई-वडिलांसाठी, मुलांसाठी आणि कुटुंबीयांसाठी अमूल्य असते, असे भावनिक आवाहनही डॉ. गोऱ्हे यांनी केले.























