सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – Cyber Fraud Pune : सायबर चोरट्यांनी बिबवेवाडी भागातील एका डाॅक्टर महिलेची ७४ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत एका डाॅक्टर महिलेने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
कंटेनरवर दुचाकी आदळून तरुणीचा मृत्यू – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ६२ वर्षीय डाॅक्टर महिला बिबवेवाडी भागातील श्री संत एकनाथनगर भागात राहायला आहे. ६ ऑक्टोबर रोजी सायबर चोरट्याने त्यांच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. ऑनलाइन वस्तू घरपोच देणाऱ्या कंपनीतून बोलत असल्याची बतावणी केली. (Cyber Fraud Pune) त्यानंतर डाॅक्टर महिला आणि त्यांच्या पतीच्या मोबाइल क्रमांकावर सायबर चोरट्याने एपीके फाईल पाठविली. सायबर चोरट्याने त्यांना एक उपयोजन (ॲप) डाऊनलोड करण्यास सांगितले. डाॅक्टर महिलेने हे ॲप मोबाइलमध्ये घेतले. बँक खात्याची माहिती त्यांनी त्यात दिली होती. या माहितीचा गैरवापर करुन चोरट्याने बिबवेवाडी भागातील एका बँकेच्या खात्यातून ७४ हजार रुपये लांबविले. खात्यातून पैसे लांबविण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर त्यांनी नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस निरीक्षक सूरज बेंद्रे तपास करत आहेत.
गुंतवणुकीच्या आमिषाने महिलेची २१ लाखांची फसवणूक
शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी एका महिलेची २१ लाख २० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याबाबत एका महिलेने चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ३९ वर्षीय महिला ओैंधमधील एका सोसायटीत राहायला आहेत. सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइल क्रमांकावर संदेश पाठविला. या संदेशात शेअर बाजारातील विविध गुंतवणूक योजनांची माहिती देण्यात आली होती. सायबर चोरट्यांनी त्यांना गुंतवणूक केल्यास चांगला परातावा मिळेल, असे आमिष दाखविले. तक्रारदार महिला चोरट्यांच्या आमिषाला बळी पडल्या. चोरट्यांनी त्यांना एका बँक खात्यात पैसे जमा करण्यास सांगितले. चोरट्यांच्या खात्यात त्यांनी महिनाभरात २१ लाख २० हजार रुपये जमा केले. रक्कम जमा केल्यानंतर चोरट्यांनी महिलेला परतावा दिला नाही, तसेच गुंतविलेली रक्कमही दिली नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम भजनावळे तपास करत आहेत.






















